यवतमाळ सामाजिक

जाणुन घ्या *”आजच्या घडामोडी”* ___________________ १) *बेटी बचाओ…बेटी पढाओ’ संदर्भात जिल्हास्तरीय कृतीदलाची बैठक*  *जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा* २) **लघु सिंचन योजनांच्या प्रगणना अंमलबजावणीबाबत* *जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा*   ३) *जिल्ह्यात 56 जण कोरोनामुक्त ; 48 नव्याने बाधित*

 

………………………………………………..

*बेटी बचाओ…बेटी पढाओ’ संदर्भात जिल्हास्तरीय कृतीदलाची बैठक*

 

*जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा*

यवतमाळ, दि. 6 :

समाजात मुलींच्या जन्माचा दर वाढून लिंग गुणोत्तरात वाढ व्हावी, मुलींच्या जन्माचे स्वागत, ‘बेटी बचाओ….बेटी पढाओ’ यासारख्या उपक्रमांसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृतीदलाची बैठक जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आली.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अरविंद गुडधे, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त भाऊसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.

 

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, ‘बेटी बचाओ….बेटी पढाओ’ बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. समाजात मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींकरीता असलेल्या विविध योजनांची माहिती, मुलींची नियमित आरोग्य तपासणी, आदींची माहिती विविध माध्यमातून करावी. यासाठी महिला अधिका-यांसोबतच समाजातील आदर्शवत महिलांनी आणि विद्यार्थीनींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी जिल्ह्याच्या लिंग गुणोत्तराबद्दल माहिती दिली. सन 2011 मध्ये जिल्ह्यात दर हजारी पुरुषांमागे 922 महिला असे गुणोत्तर होते. सन 2015 – 196 मध्ये 969 आणि 2019 – 20 मध्ये हे गुणोत्तर 986 आहे. तसेच जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली असून तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय कृतीदलांची स्थापनासुध्दा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

______________________________

*लघु सिंचन योजनांच्या प्रगणना अंमलबजावणीबाबत*

*जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा*

 

यवतमाळ, दि. 6 :

केंद्र सरकारकडून राष्ट्रव्यापी लघुसिंचन योजनांची (0 ते 2000 हे. सिंचन क्षमता) आणि जलसाठ्यांची सहावी प्रगणना करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील लघुसिंचन योजनांच्या प्रगणना अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

 

यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, जिल्ह्यात साध्या विहिरी, उथळ, मध्यव व खोल कुपनलिका तसेच विविध पाणी साठवण असलेल्या जवळपास 90 हजार जागा आहेत. या सर्वांची सहावी प्रगणना करण्यासाठी जलसंपदा विभाग, कृषी विभाग, पैनगंगा पुनर्वसन, लघुपाटबंधारे विभागातील 152 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत ही प्रगणना पूर्ण करावयाची असून त्यासाठी ॲप व टेम्लेटबाबत पुढील आठवड्यात प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. प्रत्येक कर्मचा-याला 15 गावातील पाणी साठवण जागांची मोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचा-यांनी हे काम प्राधान्याने करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

 

सहाव्या प्रगणनेमध्ये साध्या विहिरी, कुपनलिका, 0 ते 2000 हे. सिंचन क्षमतेचे लघुसिंचन योजना, धरण, कालवे, बंधारे, विमोचक, बंद नलिका वितरण प्रणाली इत्यादीमुळे केले जाणारे प्रवाही सिंचन आणि नदी, नाले, बंधारे, जलाशय इत्यादीवरील उपसा सिंचन योजना, नागरी आणि ग्रामीण भागातील जलसाठे, कृषी व मृदसंधारण विभागाकडील सिमेंट बंधारे, शेततळे, सिंचन विहिरी, भुजल सर्वेक्षण यंत्रणेसंबंधित कुपनलिकांची प्रगणना करण्यात येईल.

 

बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा संधारण अधिकारी सुहास गायकवाड, निम्न पैनगंगा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल वसुलकर, सुनील कोंडावार आदी उपस्थित होते.

___________________________

*जिल्ह्यात 56 जण कोरोनामुक्त ; 48 नव्याने बाधित*

 

यवतमाळ, दि. 6 :

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 56 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गत 24 तासात 48 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 6) एकूण 589 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 48 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 541 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 370 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12937 झाली आहे. 24 तासात 56 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12163 आहे. तर जिल्ह्यात एकूण 404 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 127259 नमुने पाठविले असून यापैकी 126622 प्राप्त तर 637 अप्राप्त आहेत. तसेच 113685 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Copyright ©