महाराष्ट्र सामाजिक

*‘2021 : भारत आणि विश्‍व यांच्या समोरील आव्हाने’ या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद !*_

दिनांक : 3.जाणे.21

 

 

*तिसरे महायुद्ध झाल्यास त्याला उत्तर देण्यास भारत सक्षम ! – तज्ञांचे मत*

यवतमाळ-

येणार्‍या काळात जर तिसरे महायुद्ध झाले, तर उपलब्ध भौतिक साधनसामुग्री आणि सैन्यबळाच्या आधारे त्याला उत्तर देण्यास भारत सक्षम आहे, असे मत ‘वर्ष 2021 : भारत आणि विश्‍व यांच्या समोरील आव्हाने’ या चर्चासत्रातील तज्ञ मान्यवरांनी व्यक्त केले. हा ऑनलाईन संवाद हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या वेळी नवी दिल्ली येथील संरक्षण आणि विदेशनीती तज्ञ श्री. अभिजित अय्यर-मित्रा, भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर, अमेरिकी संशोधक तथा ‘पीगुरुज्’ संकेतस्थळाचे संपादक श्री. श्री अय्यर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे हे सहभागी झाले होते. हा कार्यक्रम फेसबूक आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमांतून 33,062 जणांनी प्रत्यक्ष पाहिला.

 

या वेळी संरक्षण आणि विदेशनीती विशेषतज्ञ श्री. अभिजित अय्यर-मित्रा म्हणाले की, प्रत्यक्ष नाही; मात्र अप्रत्यक्षरित्या चीन तिसर्‍या महायुद्धाचे कारण होऊ शकतो. चीनने भारतावर आक्रमण केल्यास पाकिस्तानही भारतावर आक्रमण करू शकतो; मात्र पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यास चीन पाकिस्तानच्या साहाय्याला येणार नाही. चीन हा स्वार्थी असल्याने तो कधी ‘उत्तर कोरिया’सारख्या स्वतःच्या मित्राच्या साहाय्याला धावून गेलेला नाही. चीन स्वत:ची हानी कमी कशी होईल, याकडे पाहतो.

 

‘पीगुरुज्’ संकेतस्थळाचे संपादक श्री. श्री अय्यर म्हणाले की, चीन विश्‍वातील विविध तंत्रज्ञानाची चोरी करून त्याची नक्कल (कॉपी) करतो. त्याचा दर्जा चांगला नाही. व्हिऐतनामच्या युद्धातून चीनला मैदानातून पळावे लागले आहे. प्रत्यक्षात चीनने युद्धे जिंकलेली नसल्यामुळे त्यांची शस्त्रे आणि विमाने युद्धात किती चालतील, हा प्रश्‍नच आहे. प्रत्यक्ष युद्धापेक्षा अन्य तंत्रज्ञान आणि साधने यांचा वापर चीनकडून होऊ शकतो.

 

भारत रक्षा मंचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर म्हणाले की, पाकिस्तानचे पंतप्रधान हे केवळ नामधारी असून सर्व कारभार तेथील पाक सैन्य चालवते, हे जगाला ज्ञात आहे. येणार्‍या काळात पाकिस्तानची परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे. भारत हा वर्ष 1962 चा राहिलेला नाही, हे चीनला लडाखच्या प्रश्‍नावरून कळले आहे. त्यामुळे युद्धाऐवजी तो नेपाळ आणि श्रीलंका यांना भारतापासून तोडण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र ते शक्य होणार नाही; कारण नेपाळचे भारताशी सांस्कृतिक संबंध असल्याने नेपाळ-भारत मैत्री अबाधित राहील.

 

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले की, जगभरात विविध देशांकडून चालू असलेला आर्थिक वर्चस्ववाद, विस्तारवाद, स्वार्थ आणि अहंकार यांमुळे विश्‍व तिसर्‍या महायुद्धाकडे चालले आहे. येणार्‍या काळात जर तिसरे महायुद्ध झालेच, तर सैन्य, शस्त्र आणि अन्य साधनसामुग्री यांमध्ये भारतापेक्षा वरचढ असलेल्या चीनला, तसेच जिहादी आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या इस्लामिक देशांना घाबरण्याचे कारण नाही; कारण धर्माची न्याय्य बाजू असल्याने कमी सैन्य आणि साधनसामग्री असतांनाही श्रीराम, श्रीकृष्ण, आर्य चाणक्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी युद्धे जिंकली आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.

 

 

Copyright ©