Breaking News यवतमाळ राजकीय सामाजिक

*जिल्ह्यातील महत्व पुर्ण बातम्या* _______________________________ १) *ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव नवीन पिढीसाठी खजिना-* पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ २) *लोककला आणि पथनाट्य निवड सुची साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१जाणे.* ३) *राज्यशासनाच्या उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार २०२० साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन* ४) *जिल्ह्यात ३० जण कोरोणामुक्त २६ बाधित*

*जिल्ह्यातील महत्व पुर्ण बातम्या*

_______________________________

१) *ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव नवीन पिढीसाठी खजिना-* पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ

२) *लोककला आणि पथनाट्य निवड सुची साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१जाणे.*

३) *राज्यशासनाच्या उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार २०२० साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन*

४) *जिल्ह्यात ३० जण कोरोणामुक्त २६ बाधित*

 

*जेष्ठ नागरिकांचा अनुभव नवीन पिढीसाठी खजिना – एसपी डॉ. भुजबळ*

 

पोलिस अधिक्षक कार्यालयात जेष्ठ नागरिक सुरक्षा कक्षाचे उद्घाटन

यवतमाळ, दि. 1 : वयोवर्षे 65 ओलांडलेले नागरिक हे जेष्ठ नागरिकांमध्ये मोडतात. आपल्यापेक्षा जास्त उन्हाळे – पावसाळे अनुभवलेल्या या नागरिकांचे कुटुंबासाठी तसेच समाजासाठी मोठे योगदान आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या अडचणींचे निराकरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नवीन पिढीसाठी तर त्यांचा अनुभव हा अमुल्य खजिनाच आहे, असे मत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी व्यक्त केले.

नववर्षाचे निमित्ताने पोलिस विभागामार्फत जेष्ठ नागरिकांच्या विविध तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच त्यासंबंधातील प्रकरणे संवेदनशीपणे हाताळण्यासाठी पोलिस अधिक्षक कार्यालयात जेष्ठ नागरिक सुरक्षा कक्ष उघडण्यात आला. या कक्षाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब चिंतावार, जेष्ठ पत्रकार न.मा. जोशी उपस्थित होते.

शासनाने जेष्ठ नागरिकांसाठी कायदा केला आहे, असे सांगून पोलिस अधिक्षक डॉ. भुजबळ म्हणाले, जेष्ठ नागरिकांसाठी जिल्हास्तरावर जिल्हा समन्वय समिती कार्यरत आहे. जेष्ठ नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, आरोग्य विषयक बाबींचा समावेश आहे. या कक्षाच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांच्या तक्रारी, समस्या, अडीअडचणी सोडविण्यास मदत होईल. कक्षात आलेल्या प्रत्येकाच्या तक्रारीची योग्य दखल घेतली जाईल. जेष्ठांबाबतचा प्रत्येक प्रश्न कायद्याने न सोडविता समुपदेशाने सोडविला जाईल. मात्र काही प्रकरणात आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाईसुध्दा करण्यात येईल.

समाजातील दु:खी किंवा अडचणींचा सामना करणारे लोक पोलिसांकडे येतात. या निमित्ताने दु:खी लोकांचे निराकरण करण्याची पोलिस विभागाला चांगली संधी आहे. पोलिस प्रशासन जबाबदार आणि संवेदनशील असले पाहिजे तसेच पोलिसांनी लोकाभिमुख राहून काम करावे, यावर आपला कटाक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जेष्ठ पत्रकार न.मा. जोशी म्हणाले, जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक हे केवळ पोलिसच नाही तर एक उत्कृष्ट आणि संवेदनशील मनाचा माणूस आहे. प्रत्येक विभागात जेष्ठ नागरिकांना सन्मान मिळणे, हा त्यांचा अधिकार आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिस अधिक्षकांसोबत चर्चा करण्यात आली, त्यावेळी त्यांनी अतिशय तळमळीने जेष्ठ नागरिकांचे प्रश्न समजून घेतले. तसेच नवीन वर्षाच्या निमित्ताने जेष्ठ नागरिक सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात येईल, असे सांगितले होते. पोलिस अधिक्षक कार्यालयात आज या सुरक्षा कक्षाचे उद्घाटन होत आहे, हे राज्यातील पहिले उदाहरण आहे, असेही न.मा.जोशी यांनी सांगितले.

यावेळी बाळासाहेब चिंतावार म्हणाले, जिल्ह्याच्या नवीन पोलिस अधिक्षकांसोबत चर्चा झाली, त्यावेळी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय झाला. माझ्या उभ्या आयुष्यात एवढा संवेदनशील एसपी मी बघितला नाही. आजच्या या कार्यक्रमाला यवतमाळसह दारव्हा, दिग्रस, नेर, पांढरकवडा आदी ठिकाणांवरून जेष्ठ नागरिक आले आहे. या कक्षाच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर निकाली निघतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी जेष्ठ नागरिक सुरक्षा कक्षाच्या 9112240466 या क्रमांकावर भ्रमणध्वनीने संपर्क साधून रितसर तक्रार नोंदविण्यात आली. तसेच महिला व बाल अत्याचार प्रतिबंध कक्षाच्या 9112240465 या क्रमांकावर महिला व बालकांसंबंधी तक्रार असल्यास संपर्क साधावा, असे जाहीर करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी केले. यावेळी बाळासाहेब त्रिवेदी, राजन टोंगो, बाळासाहेब पाटील, भरत राठोड, राजीव निलावार, सतिश बनगिरवार, साधना बंडेवार, सुरेखा ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

भारताच्या संविधानातील अनुच्छेद 39 व 41 मध्ये जेष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या त-हेने घालविता यावा, समाजात त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्याच्या आर्थिक क्षमता, कामाचा, शिक्षणाचा आणि सार्वजनिक मिळविण्याचा हक्क शाबूत असावा यासाठी राज्य सरकारने 14 जून 2014 ला ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले.

___________________________________

 

*लोककला आणि पथनाट्य निवडसूचीसाठी*

*अर्ज करण्याची अंतीम तारीख 21 जानेवारी*

यवतमाळ, दि. 1: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला व पथनाट्य (उदाहरणार्थ गण-गवळण, अभंग, पोवाडे, वगनाट्य, बहुरूपी, भारुड इत्यादी) निवडसूची तयार करण्याचे काम सुरू आहे. याबाबत सदर क्षेत्रातील अनुभवी संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पथकाला विविध विषयांवर (शासकीय योजनांसह) कार्यक्रम / पथनाट्य करण्याचा अनुभव असावा. पथक किमान दहा जणांचे असावे, यात स्त्री – पुरुष, वादक यांचा समावेश असावा. केंद्र सरकारच्या गीत व नाट्य विभागाकडे नोंदणीकृत असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच संस्थेकडे स्वत:ची ध्वनीक्षेपण यंत्रणा असणे अपेक्षित आहे.

इच्छुक संस्थांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधून अर्जाचा नमुना नि:शुल्क प्राप्त करून घ्यावा. अर्जाचे नमुने व माहिती www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरही उपलब्ध आहेत. लोककला व पथनाट्य यांची निवडसूचीसाठी अर्ज करण्याच्या दिनांक 1 जानेवारी ते 21 जानेवारी 2021 पर्यंत आहे. विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ यांना 21 जानेवारी 2021 पर्यंत मिळतील, अशा बेताने पाठवावे, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

_______________________________

*राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार 2020 साठी*

 

*प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन*

 

यवतमाळ, दि. 1 : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारीता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दुरचित्रवाणी] वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखानासाठी पुरस्कार स्पर्धा जाहिर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहे. प्रवेशिका पाठविण्याचा अंतीम दिनांक 31 जानेवारी 2021 आहे.

 

राज्यस्तरावर मराठीकरीता बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार 51 हजार रूपये रोख, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, इंग्रजीकरीता अनंत गोपाळ शेवळे पुरस्कार 51 हजार रूपये रोख, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, हिंदी करीता बाबुराव विष्णू पराडकर पुरस्कार 51 हजार रूपये रोख, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, उर्दु करीता मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार 51 हजार रूपये रोख, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येईल. याशिवाय विभागीय स्तरावरील पुरस्कारसुध्दा देण्यात येणार आहे. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीय स्तर आहे. इंग्रजी, हिंदी, उर्दु या भाषेतील पुरस्कार तसेच सोशल मिडीया पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्विकारण्याची तयारी असल्याचे संबंधीत पत्रकाराचे संमतीपत्र प्रवेशीकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

 

पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मुळ लिखानाचे कात्रण त्याच्या दोन प्रतीसह पाठवावे, अन्यथा प्रवेशिका रद्द होईल. पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

_______________________________

*जिल्ह्यात 30 जण कोरोनामुक्त तर 26 नव्याने पॉझेटिव्ह*

 

यवतमाळ, दि. 1 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्याh आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 30 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गत 24 तासात जिल्ह्यात 26 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 1) एकूण 298 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 26 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 272 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 343 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12724 झाली आहे. 24 तासात 30 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11980 आहे. तर जिल्ह्यात एकूण 401 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 124453 नमुने पाठविले असून यापैकी 123874 प्राप्त तर 579 अप्राप्त आहेत. तसेच 111150 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Copyright ©