*आजच्या ठळक घडामोडी*
१) *जिल्ह्यातील २०४६ गावाची अंतिम आणेवारी ४६पैसे*
२) *इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित*
३) *आर्णी व दारव्हा येथील शासकीय वस्तीगृहासाठी जमिनिनीची आवश्यकता*
४) *आरटीओ कार्यालयाकडून दुचाकी करिता नवीन मालिका*
*जिल्ह्यातील 2046 गावांची अंतिम पैसेवारी 46 पैसे*
50 पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या निरंक
यवतमाळ, दि. 31 :
खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ही शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे. ही पैसेवारी 50 च्या आत असेल तर शासनाकडून जिल्ह्याला काही प्रमाणात सवलती मिळतात. यात जमीन महसूलात सुट, शेतक-यांच्या कर्जाची सक्तीने वसूली न करणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, नरेगाच्या टंचाई कामांना प्राधान्य, शेतक-यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ आदींचा समावेश आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी अंतिम पैसेवारी ही वस्तुनिष्ठ पध्दतीने प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी करून जाहीर करण्याबाबत वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी 31 डिसेंबर 2020 रोजी जिल्ह्याची सन 2020-21 ची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे 2046 गावांची अंतिम पैसेवारी 46 पैसे असल्याचे जिल्हाधिका-यांनी विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या अहवालात नमुद केले आहे.
यवतमाळ जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 13 लक्ष 9 हजार 592 हेक्टर आर. आहे. 16 तालुके असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात 110 महसुली मंडळ, 682 समाविष्ट साझे आणि जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या 2159 आहे. यापैकी 2046 गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 46 पैसे जाहीर करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील उर्वरीत 113 गावांची पैसेवारी काढण्यात आली नाही.
तालुकानिहाय अंतिम पैसेवारी जाहीर झालेल्या गावांची संख्या 2046 असून यात यवतमाळ तालुक्यातील 135 गावे, कळंब तालुक्यातील 141 गावे, बाभुळगाव तालुक्यातील 133, आर्णि तालुक्यातील 106, दारव्हा तालुक्यातील 146, दिग्रस तालुक्यातील 81, नेर तालुक्यातील 121, पुसद तालुक्यातील 185, उमरखेड तालुक्यातील 136, महागाव तालुक्यातील 113, केळापूर तालुक्यातील 130, घाटंजी तालुक्यातील 107, राळेगाव तालुक्यातील 132, वणी तालुक्यातील 155, मारेगाव तालुक्यातील 108 आणि झरीजामणी तालुक्यातील 117 गावांचा समावेश आहे.
तसेच संपूर्ण जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 46 पैसे असली तरी यात यवतमाळ, नेर, केळापूर, घाटंजी, वणी आणि मारेगाव या तालुक्यांची पैसेवारी 46 पैसे, कळंब, बाभुळगाव, आर्णि, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव आणि राळेगाव या तालुक्यांची पैसेवारी 47 पैसे तर झरीजामणी या तालुक्याची पैसेवारी 48 काढण्यात आली आहे. पैसेवारी न काढण्यात आलेल्या गावांमध्ये यवतमाळ तालुक्यातील 17 गावे, कळंब तालुक्यातील 2 गावे, बाभुळगाव तालुक्यातील 7, आर्णि तालुक्यातील 5, दारव्हा आणि नेर तालुक्यातील 0, दिग्रस तालुक्यातील 1, पुसद तालुक्यातील 4, उमरखेड तालुक्यातील 22, महागाव तालुक्यातील 3, केळापूर तालुक्यातील 11, घाटंजी तालुक्यातील 15, राळेगाव तालुक्यातील 1, वणी आणि मारेगाव तालुक्यातील प्रत्येकी 7 आणि झरीजामणी तालुक्यातील 11 गावांचा समावेश असल्याचे जिल्हाधिका-यांच्या अहवालात नमुद आहे.
______________________________
*इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित*
यवतमाळ, दि. 31 : पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत केळापूर, घाटंजी, वणी, मारेगाव, झरी, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, यवतमाळ हे तालुके येतात. या कार्यक्षेत्रातील सन 2021 – 22 या वर्षाकरीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी प्रवेशाकरीता विनामुल्य अर्ज मागविण्यात येत आहे.
इयत्ता 1 ली 2 री मध्ये प्रवेश देण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जन्म तारखेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे कुटूंबातील वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 1 लाख रुपये इतकी राहील. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड छायांकित प्रत प्रवेश अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पूर्ण असावे. विधवा, घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या व दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येतील. तसे प्रमाणपत्र प्रवेश अर्जासोबत जोडावे लागेल. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येतील. निवड केलेल्या विद्यार्थ्यांला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकाच्या व पाल्याच्या विनंती नुसार शाळा बदलता येणार नाही.
सदर अर्जासोबत अर्जदार विद्यार्थ्यांचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र, पालकाचे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अंगणवाडीचा दाखला (पहिल्या इयत्तेसाठी) ग्रामसेवकाचा दाखला, दारिद्रय रेषेखालील असल्याबाबतचा दाखला, ग्रामसेवकाचा दाखला, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड, महिला पालक विधवा, घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला, विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
प्रत्येक शासकीय, अनुदानित आश्रमशाळांच्या पातळीवर व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प, पांढरकवडा या कार्यालयात प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. आवश्यक त्या कागदपत्रासह अचूक माहिती भरून अर्ज दिनांक 31 जानेवारी 2021 पर्यंत या कार्यालयात सेतू विभागात सादर करण्यात यावे. नामांकित शाळा योजनेंतर्गत पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाखापेक्षा कमी असावे, असा नियम असतांना काही विद्यार्थ्यांचे पालक (आई-वडील) शासकीय, खाजगी नोकरीवर असतांना या योजनेचा लाभ घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेव्हा अशा पालकांनी जर विभागाला चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेऊन इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश केल्यास तो रद्द करून या योजनेचा लाभ सोडावा. या कार्यालयाच्या तपासणीमध्ये असे विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतल्याचे आढळून आल्यास त्या विद्यार्थ्यांचे पालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन यांनी कळविले आहे.
_______________________________
*आर्णी व दारव्हा येथील शासकीय वसतीगृहासाठी जमिनीची आवश्यकता*
जमीन मालकांनी संपर्क करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 31 : सामाजिक न्याय विभागामार्फत आर्णि आणि दारव्हा येथे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह सुरु आहे. सदर वसतीगृह सध्या भाड्याच्या इमारतीत सुरु असून या शासकीय वसतीगृहाकरीता शासकीय इमारत बांधावयाची आहे. याकरीता आर्णी व दारव्हा या शहराच्या लगत अथवा 1 किमी परीसरात खाजगी जमीन मालकाकडून जमीन विक्रीचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
ज्या शेतमालकाला वरील परिसरातील त्यांच्या स्वमालकीची जमीन विक्री करावयाची आहे. त्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यवतमाळ अथवा आर्णि आणि दारव्हा येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहाच्या गृहपाल यांचेशी संपर्क साधावा. सदर जमीन तातडीने खरेदी करावयाची असल्याने इच्छुकांनी तात्काळ संपर्क करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे
________________________________
*आरटीओ कार्यालयाकडून दुचाकी वाहनांकरीता नवीन मालिका*
यवतमाळ, दि. 31 : उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे परिवहनेत्तर विभागाकरीता वाहन 4.0 प्रणाली अंतर्गत दुचाकी वाहन (स्कूटर / मोपेड/ मोटार सायकल) यासाठी MH-29/BR-0001 to 9999 ही मालिका सुरू करण्यात आली होती. सदर मालिका 31 डिसेंबर 2020 रोजी संपुष्टात येत असून दुचाकीसाठी आता MH-29/BS-0001 to 9999 ही मालिका निर्गमित करण्यात येत आहे.
नवीन मालिकेतील आकर्षक क्रमांक (1) उपलब्ध करण्यात आला असून या क्रमांकाकरीता इच्छुक अर्जदारांनी विहित नमुन्यात अर्ज 4 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत कार्यालयात सादर करावेत. वर नमुद मालिकेतील नियमित क्रमांक 5 जानेवारी 2021 पासून देणे सुरू होईल, याची नोंद घ्यावी, असे उप- प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वाढोकर यांनी कळविले आहे.
Add Comment