सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केली निमोनियाची लस, बालकांवरील न्यूमोनियाच्या ‘न्यूमोकॉकल काँजुगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही)’ – ‘न्यूमोसिल’ या लशीचे औपचारिक उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी केले. या वेळी सीरमचे संस्थापक संचालक डॉ. सायरस पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला आणि कार्यकारी संचालक डॉ. राजीव ढेरे उपस्थित होते.
बालकांमधील न्यूमोनिया रोखणारी ‘न्यूमोसिल’ही लस सीरम इन्स्टिटय़ूट, पाथ तसेच बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त भागीदारीतून तयार करण्यात आली आहे.
जागतिक स्तरावर पाच वर्षांखालील सर्वाधिक बालकांच्या मृत्यूचे कारण न्यूमोनिया हे आहे, त्यांपैकी २० टक्के बालके भारतीय आहेत. आतापर्यंत लस आयात करत असल्यामुळे ती देशातील सर्व बालकांसाठी देणे शक्य नव्हते. आता सीरमने तयार केलेली संपूर्ण भारतीय बनावटीची लस भारतासह जगातील बालमृत्यू रोखण्यास मदत होणार आहे, असे मत डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी व्यक्त केले.
अदर पूनावाला म्हणाले, ‘बालकांमधील लसीकरणासाठी उत्तम दर्जाच्या लशी परवडणाऱ्या कि मतीत उपलब्ध करून देणे हा सीरमचा सतत प्रयत्न आहे. संशोधन, चाचण्या आणि उत्पादन अशा सर्व निकषांवर संपूर्ण स्वदेशी बनावटीची ही लस भारतातील आणि इतर गरीब व विकसनशील देशांमधील बालकांना न्यूमोनियापासून संरक्षण देण्यास महत्वाचे ठरणार आहे. भारतात दरवर्षी ७१ टक्के बालमृत्यू न्यूमोनियामुळे होतात, तर ५७ टक्के बालकांमध्ये सर्रास न्यूमोनियाचा संसर्ग दिसून येत आहे. २०१८ मध्ये भारता देशात पाच वर्षांखालील ६७,८०० मुले न्यूमोनियामुळे दगावली. त्यामुळे एकात्मिक लसीकरण कार्यक्रमात न्यूमोकॉकल लशीचा समावेश करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आली आहे.
Add Comment