Breaking News यवतमाळ

*जिल्हा माहिती अधिकारी कार्यालया कडून आज दिवसभरातील घडामोडी*

जाणुन घ्या दिवसभरातील घडामोडी

 

*जिल्ह्यात 53 जण कोरोनामुक्त ; 50 नव्याने पॉझेटिव्ह*

२) *25, 26, 27 डिसेंबर (शासकीय सुट्टी) रोजी जात प्रमाणपत्र*

 

*पडताळणी समिती कार्यालय सुरू राहणार*

३) *नाताळ (ख्रिसमस) साध्या पध्दतीने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सुचना*

४) *माहूरगड येथील दत्त जयंती यात्रा रद्द*

 

 

 

 

जिल्ह्यात 53 जण कोरोनामुक्त ; 50 नव्याने पॉझेटिव्ह

 

यवतमाळ, दि. 24 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 53 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गत 24 तासात जिल्ह्यात 50 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.24) एकूण 331 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 50 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 281 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 337 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12436 झाली आहे. 24 तासात 53 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11705 आहे. तर जिल्ह्यात एकूण 394 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 121020 नमुने पाठविले असून यापैकी 120250 प्राप्त तर 770 अप्राप्त आहेत. तसेच 107814 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे

_________________________________

25, 26, 27 डिसेंबर (शासकीय सुट्टी) रोजी जात प्रमाणपत्र

 

पडताळणी समिती कार्यालय सुरू राहणार

 

यवतमाळ, दि. 24 : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोचपावती जोडणे बंधनकारक केले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ येथील कार्यालयास निवडणुकीत उभे राहू इच्छिणा-या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत आहे. त्यामुळे उमेदवारांची गैरसोय होऊ नये, म्हणून 25, 26 आणि 27 डिसेंबर या शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी समिती कार्यालय नियमित सुरू ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी यांनी कळविले आहे.

 

________________________________

नाताळ (ख्रिसमस) साध्या पध्दतीने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सुचना

 

यवतमाळ, दि. 24 : कोविड – 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नाताळ सण (ख्रिसमस) साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचना यवतमाळ जिह्याकरीता खालीलप्रमाणे लागू करण्यात येत आहे.

 

ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पध्दतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्ताने चर्चमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर राखले जाईल, याची काळजी घ्यावी. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नाताळ सणाच्या दिवशी चर्चमध्ये येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री इतर काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी सामाजिक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी जास्तीत जास्त 10 गायकांचा समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करून सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे. चर्चच्या बाहेर व परिसरात दुकाने / स्टॉल लावण्यात येऊ नयेत.

 

60 वर्षांवरील नागरिकांना तसेच 10 वर्षाखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे व सण घरामध्येच साजरा करावा. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोर पालन करण्यात येऊ नये. 31 डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना ही मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी 7 वाजता किंवा त्यापुर्वी घेण्याचे नियोजन करावे.

 

कोविड – 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत नगर परिषद / नगर पंचायत, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे.

 

_________________________

 

माहूरगड येथील दत्त जयंती यात्रा रद्द

 

यवतमाळ, दि. 24 : श्री. दत्त संस्थान माहुर तर्फे दत्‍त जयंती सोहळा सात दिवस मोठ्या प्रमाणावर दरवर्षी परंपरेने साजरा होत असतो. यावर्षी कोविड – 19 मुळे सामान्य जनता, यात्रेला येणारे भाविक भक्त यांना कोणताही प्रादुर्भाव होऊ नये म्हणून श्री. दत्त संस्थानच्या विश्वस्तानी यावर्षी होणारी यात्रा रद्द केली आहे. संस्थेतर्फे सर्व भाविक भक्तांना सुचित करण्यात येते की, या वर्षीच्या यात्रेला सामील न होता आपआपल्या घरीच दत्त जयंतीचे कार्यक्रम कुटुंबासोबत साजरा करावा. दिनांक 27 ते 29 डिसेंबर 2020 दरम्यान संस्थेच्या दत्त मंदीर परिसराचे प्रवेशद्वार बंद राहील, याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी, असे माहूर येथील दत्तात्रय संस्थानचे व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

Copyright ©