Breaking News यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

*जाणुन घ्या* *दिवसभरातील शासन स्तरावरील विशेष घडामोडी शासनाच्या योजना*

*एका कोरोनाबाधित मृत्युसह 49 नव्याने पॉझेटिव्ह*

 

34 जण कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 21 : गत 24 तासात जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 49 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 34 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

मृतकामध्ये राळेगाव तालुक्यातील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.21) एकूण 296 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 49 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 247 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 313 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12277 झाली आहे. 24 तासात 34 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11575 आहे. तर जिल्ह्यात एकूण 389 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 119838 नमुने पाठविले असून यापैकी 119268 प्राप्त तर 570 अप्राप्त आहेत. तसेच 106991 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

__________

 

*जिल्हाधिका-यांकडून शेतकरी आत्महत्येच्या नऊ प्रकरणांचा आढावा*

_______________________________

यवतमाळ, दि. 21 : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेऊन प्रकरणे निकाली काढली. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत एकूण 9 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यात पात्र प्रकरणातील कुटुंबियांना शेतामध्ये नरेगा अंतर्गत विहिरी देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. एका आठवड्याच्या आत संबंधित नायब तहसीलदार, तलाठी, पोलिस पाटील आणि ग्रामसेवक यांनी सदर कुटुंबियांकडून सर्व कागदपत्रे तयार करून घ्यावीत. यात कोणतीही चालढकल करू नये. तसेच काही कुटुंबांना शेतात पंप, जोडधंदा म्हणून गाई-म्हशी वाटप, शेटीवाटप आदींचा लाभ द्यावा. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सुध्दा सदर कुटुंबाना लाभ देण्याचे नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी केल्या.

 

यावेळी आर्णि तालुक्यातील माळेगाव येथील कैलास पवार यांच्या कुटुंबियांना नरेगा अंतर्गत विहिरीचा लाभ, आर्णि तालुक्यातील कु-हा येथील अक्षय पुसनाके यांच्या कुटुंबियांना विहिर, मारेगाव तालुक्यातील टाकळी येथील विठ्ठल जुमनाके यांच्या कुटुंबियांना विहिर, केळापूर तालुक्यातील अर्ली येथील संतोष बोरकर यांच्या कुटुंबियांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, घाटंजी तालुक्यातील आंबेझरी येथील विजय कोटनाके यांच्या कुटुंबियांना शेळीवाटप, झरीजामणी तालुक्यातील दाभाडी येथील शरद आत्राम यांच्या कुटुंबियांना विहिर व शेळीपालन, नेर तालुक्यातील सोनवाढोणा येथील राजेश राठोड यांच्या कुटुंबियांना विहिर व शेतीला कुंपण, नेर तालुक्यातील पिंपरी कलगा येथील राजेश तुपटकर यांच्या कुटुंबियांना विहिर आणि दिग्रस येथील रामनगरातील शत्रृघ्न शेंगर यांच्या कुटुंबियांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे प्रस्तावित केले.

 

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अरविंद गुडधे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, पशुसवंर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. बी. आर. रामटेके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते. बैठकीला संबंधित गावांचे तलाठी, पोलिस पाटील, नायब तहसीलदार आदी उपस्थित होते.

 

 

*महाडीबीटी पोर्टल योजना : अर्ज एक, योजना अनेक फायदे*

_______________________________

डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

यवतमाळ, दि. 21 : कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरीता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरीता अर्ज करावयाचा आहे. या अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2020 आहे.

 

योजेनचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक/ लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील.

 

वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करावा. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

 

पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रीया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची आवश्यकता नाही. ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनाचा लाभ मिळविण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत, या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

 

 

*शासकीय आयटीआय येथे 22 डिसेंबर रोजी रोजगार भरती मेळावा*

_______________________________

यवतमाळ, दि. 21 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे 22 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. यात पुणे येथील जबील इलेक्ट्रॉनिक्स, ब्रिटानिया, एक्साईड बॅटरी, वारोक पॉलिमर्स, जेसीबी इंजिन टेक या कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होतील.

 

या रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त आयटीआय उत्तीर्ण व अंतीम वर्षाची परीक्षा दिलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभागी व्हावे व नामांकित कंपनीमध्ये रोजगार मिळण्यासाठी प्राप्त झालेल्या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य कविता बुटले व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रमोद भंडारे यांनी केले आहे.

 

 

*राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या*

 

*योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

____________________________

यवतमाळ, दि. 21 : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. सदर असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यात प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार सन 2020-21 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

असमान निधी योजना सन 2020-21 साठी ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामुग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य, बाल ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान बाल कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य यांचा समावेश आहे.

 

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधीत जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. उपरोक्त योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा नमुना सुधारीत स्वरुपात असावा. अर्जामध्ये नमुद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेमधील परिपूर्ण प्रस्ताव चार प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दिनांक 8 जानेवारी 2021 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन मुंबई येथील ग्रंथालय संचालक शलिनी इंगोले यांनी राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.

__________________________

*पुसद येथे बाल पोलीस पथक कार्यशाळा*

 

यवतमाळ, दि. 21 : जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व‍ जिल्हा पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल न्याय अधिनियम (मुलांची काळजी व संरक्षण) 2015 याबाबतची कार्यशाळा पुसद शहर पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुसद उपविभागीय अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

 

सदर कार्यशाळेमध्ये पोलीस स्टेशन स्तरावर नेमण्यात आलेले बाल कल्याण पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015, बाल‍ विवाह प्रतिबंधक कायदा 2006 याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तालुका बाल संरक्षण समिती, गाव बाल संरक्षण समिती, जिल्हास्तरीय बालकांच्या बाबत असलेल्या यंत्रणा, त्यांची कार्ये, कर्तव्ये व भुमिका याविषयी चर्चा करण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर, माहिती विश्लेषक सुनिल बोकसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

तसेच बाल न्याय व्यवस्था अंतर्गत काम करतांना येणाऱ्या अडचणीचे शंका निरसन यावेळी करण्यात आले. बालकांच्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे हे एका व्यक्तीची जबाबदारी नसून ही बालकांचे कुटूंब, समाज, सर्व संबंधीत विभाग यांची संयुक्तिक जबाबदारी आहे. समाजात बालकांचे अनेक प्रश्न आहेत व ते तितक्याच संवेदनशीलपणे हाताळणे आवश्यक आहे, असे मत ज्योती कडू यांनी व्यक्त केले. ही कार्यशाळा पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी पोलीस निरीक्षक पी.व्ही.फाडे, सहा. पोलीस निरीक्षक गणेश इंगोले व पोलीस उपविभागीय कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Copyright ©