यवतमाळ सामाजिक

सीसीटीव्हीसाठी आर्णी प्रेस क्लबचा पुढाकार

 

( तहसीलदार,नगराध्यक्ष, मुख्याधिकारीठाणेदारांना निवेदन )

आर्णी (प्रतिनिधी): गेली दोन वर्षांपासून शहरातील सीसीटीव्ही लावण्याचे काम प्रलंबित असून संबंधित काम तात्काळ सुरू करण्यात यावे याकरिता आता आर्णी प्रेस क्लब ने तहसीलदार, नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व ठाणेदार यांना संयुक्तिक निवेदन दिले.
दोन वर्षां पूर्वी माजी आमदार राजू तोडसाम यांनी शहरात वाढती चिडीमारी व लहान-मोठया गुन्हेगारी घटनेला चाप बसावा याकरिता तब्बल 18 लक्ष रुपयांचा निधी नगर परिषदेला उपलब्ध करून दिला. मात्र 2 वर्षे लोटूनही नगर परिषद शहरात सीसीटीव्ही लावण्यात अपयशी ठरली.
याबाबत नगर सेवक निलंकुश चव्हाण यांनी उपोषण करून सुद्धा केवळ आश्वासन देऊन त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. याबाबत आर्णी प्रेस क्लब ने सविस्तर माहिती घेतली असता केवळ सीसीटीव्हीची दुरुस्ती देखभाल कोण करणार यामुळे संबंधित कामाच्या निविदा काढण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही दुरुस्ती देखभाल पोलीस स्टेशन ने करावी याबाबत नगर परिषदेच्या सभागृहाने ठराव घेतला होता. मात्र पोलीस स्टेशनकडे यासाठी कोणताही निधी येत नसल्याने त्यांनी याबाबत असमर्थता दर्शविली म्हणून संबंधित कामाची फाईल धूळ खात पडली होती. केवळ देखभाल दुरुस्तीसाठी शहराच्या सुरक्षिततेच्या बाबतीत अतिमहत्वाच्या कामास खिळ लागली होती. त्यामुळे आर्णी प्रेस क्लब ने संबंधित सीसीटीव्ही कॅमेराच्या देखभाल दुरुस्तीची जवाबदारी स्वीकारत तात्काळ निविदा काढण्या बाबत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, ठाणेदार व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. याबाबत नगर परिषद काय भूमिका घेणार याकडे आर्णीकरांचे लक्ष लागले आहे.
यावेळी आर्णी प्रेस क्लब चे अध्यक्ष गणेश हिरोळे, उपाध्यक्ष नौशाद अली, सचिव विनोद सोयाम, रफिक सरकार,असिफ शेख, सचिन चहांदे, गणेश धनोडे, वीरेंद्र पाईकराव, इरफान रजा, जाफर शेख, आरिफ शेख,राम पवार, राम होले, अक्रम सय्यद आदी प्रेस क्लब चे सदस्य उपस्थित होते.

Copyright ©