यवतमाळ सामाजिक

तोतया विद्युत अभियंत्याकडून महिलेची फसवणूक ( गुन्हा दाखल, सतर्कतेचा इशारा )

 

आर्णी (प्रतिनिधी): येथील स्थानिक रहिवासी महिलेला विद्युत मीटर रिडींग फोटो घेणाऱ्यांनी स्वतः विद्युत वितरण कंपनी मधील अभियंता असल्याची बतावणी करून कारवाईचा धाक दाखवत ४ हजार रुपयांनी गंडविल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. आपल्याला फसवल्या गेल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने विद्युत महावितरण च्या अधिकाऱ्यांना आपबीती सांगितल्या नंतर महावितरण विभाग कडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
स्थानिक लक्ष्मीनारायण नगर येथे वास्तव्यास असलेल्या शबानाबी युसूफ खान पठाण यांचे राहते घरी ४ डिसेंबर ला दुपारी ११ वाजता मनोज खंडारे व अतुल काठोळे हे दोन व्यक्ती आले होते. आम्ही विद्युत महावितरण विभागात अभियंता असून विद्युत मीटर तपासणी करण्यासाठी आले असल्याची बतावणी त्यांनी केली. मीटरची तपासणी केल्यानंतर मीटर सोबत छेडखणी केल्याचा आरोप करत 50 हजार रुपये दंड करण्याची त्यांनी धमकी दिली. दंडात्मक कारवाई थांबवायची असेल तर 10 हजार रुपये देऊन प्रकरण निपटवायचा प्रस्ताव त्यांनी दिला. सर्व काही अचानक घडल्यामुळे घाबरलेल्या महिलेने कारवाई च्या भीतीपोटी त्या तोतया अभियंत्यास 4 हजार रुपये दिले. संबंधित घटनेची चित्रफीत मोबाईल मध्ये रेकॉर्ड करण्यात आली होती. आपण गंडविले गेल्याचे जेव्हा त्यांना कळले तेव्हा महावितरण कार्यालयाकडे धाव घेतली. व्हिडीओ चित्रीकरण पाहून उपकार्यकारी अभियंता यांनी तक्रारीनुसार चौकशी केली असता महात्मा फुले वायरमन व औद्योगिक सहकारी संस्था यवतमाळ या एजन्सी कडे विद्युत मीटर रीडर म्हणून उपरोक्त गंडा घालणारे दोघे काम करत असल्याची माहिती समोर आली. आर्णी पोलिसांनी याप्रकरणी कलम १७०,४१९,३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार पितांबर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
विद्युत मीटर रीडर ला फोटो काढण्याव्यतिरिक्त कोणतेच अधिकार नसून गंडविण्याची नवीन शक्कल तोतयागिरी करणाऱ्यांनी काढली आहे. तेव्हा नागरिकांनी सतर्क राहून तोतयागिरी करणाऱ्याच्या फसव्या कार्यवाहिस बळी पडू नये असा इशारा महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी चे आर्णी चे उपकार्यकारी अभियंता नरेंद्र राऊत दिला.

Copyright ©