महाराष्ट्र सामाजिक

भारतात ८ कोरोना लसींवर क्लिनिकल ट्रायल सुरु; कोणत्या टप्प्यांत पोहोचली लसींची चाचणी?

 

 

कोविड-१९ वॅक्सिनच्या ट्रायलसंदर्भात सांगताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, भारतामध्ये ८ कोरोना वॅक्सिन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहेत.

Corona Vaccine : जगभरातील सर्वच लोक कोरोना व्हायरसवरील प्रभावी लसीकडे डोळे लावून बसले आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. अशातच सर्व देशांचं लक्षं भारताकडे लागलं आहे. भारतात पुढिल काही दिवसांतच कोरोना वॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली जाऊ शकते. भारतीय ड्रग्ज कंट्रोलरच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, कमीत कमी तीन वॅक्सिन आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यासाठी विचारात घेतल्या जात आहेत. पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट आणि हैदराबादची औषध कंपनी भारत बायोटेकनं याआधीच ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.

सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनाइजेशन (सीडीएससीओ) च्या एक तज्ज्ञ कमिटीच्या वतीने सीरम आणि भारत बायोटेकच्या वतीने करण्यात आलेल्या अर्जाचं विश्लेषण करण्यात आलं. त्यानंतर अतिरिक्त सुरक्षा आणि लस कितपत प्रभावी आहे, त्यासंदर्भात अधिकची माहिती संबंधित कंपन्यांकडे मागण्यात आली आहे. अमेरिकन औषध कंपनी फायझरनेही भारतात लसीच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालय सध्या सुरु असलेल्या लसींच्या चाचण्यांसाठी तिनही कंपन्यांना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली जाऊ शकते.

भारतात कोविड-१९ वॅक्सिनच्या ट्रायलसंदर्भात सांगताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, भारतामध्ये ८ कोरोना वॅक्सिन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहेत. एक कोविशिल्ड आहे, जी एस्ट्रेजेनिकाच्या सहयोगाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करत आहे. या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांतील चाचणी सध्या सुरु आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीने केंद्र सरकारकडे लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागण्यात आली आहे.

आणखी एक लस आहे कोवॅक्सिन. ही स्वदेशी लस असून भारत बायोटेक कंपनी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या मदतीने तयार करत आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकनं केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे.

तिसरी कोरोना लस ZyCOV-D.ही लस अहमदाबादमध्ये कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडच्या वतीने केंद्र सरकारच्या विभाग बायोटेक्नॉलोजीच्या सहयोगातून तयार करण्यात येत आहे. याची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या सुरु आहे.

याव्यतिरिक्त, चौथी लस स्पूतनिक-V, जी डॉक्टर रेड्डी लॅब हैदराबाद येथे रशियातील गामलेया नॅशनल सेंटरच्या मदतीने तयार करण्यात येत आहे. या लसीची दुसऱ्या टप्प्यातील भारतातील चाचणी पूर्ण झाली असून तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला पुढिल आठवड्यात सुरुवात होणार आहे.

पाचवी लस आहे, NVX-CoV2373. ही लस सीरम इन्स्टिट्यूटने नोवॅक्सनच्या मदतीने तयार केली आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी ड्रग रेग्युलेटर विचार करत आहेत.

सहावी लस आहे, रिकोबिएंट प्रोटीन अँटीजेनवर आधारित लस, जी बायोलॉजिकल ई. लिमिटेड हैदराबादच्या वतीने एमआयटी, यूएसए्या मदतीने तयार करण्यात येत आहे. या लसीचं प्राण्यांवर क्लिनिकल ट्रायल करण्यात आलं आहे. तसेच माणसांवर पहिल्या टप्प्यातील ट्रायल सुरु झालं आहे.

सातवी लस आहे, HGCO 19 वॅक्सिन. पुण्यात जेनोवाच्या वतीने HDT, USA च्या मदतीने तयार करण्यात येत आहे. या लसीचं प्राण्यांवर प्री-क्लिनिकल ट्रायल करण्यात आलं आहे. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच सुरु होणार आहे.

आठवी लस भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्या वतीने थॉमस जेफ्फरसोन यूनिवर्सिटी, यूएसए तयार करत आहे. ही लस अद्यापही प्री-क्लिनिकल स्टेजमध्ये आहे.

Copyright ©