विदर्भ शैक्षणिक

चंद्रपूर सैनिक शाळेत ६ व ९ वर्गासाठी प्रवेश

सैनिकी शाळेमध्ये प्रवेशासाठी 19 नोव्हेंबर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

नागपूर द.10 :  महाराष्ट्रातील चंद्रपूर, सातारासह देशभरातील एकूण 33 सैनिकी शाळांमध्ये वर्ग 6 व वर्ग 9 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर आहे. महाराष्ट्रात सातारा नंतर चंद्रपूर येथे सैनिकी शाळा सुरू झाली असून सैन्य दलात आपल्या पाल्याला प्रवेश देण्यासाठी इच्छूक असणाऱ्या पालकांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सैनिकी शाळेमार्फत करण्यात आले आहे.

देशातील 33 सैनिकी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली असून राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत (एनटीए) यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सातारा नंतर दोन वर्षापूर्वी विदर्भात चंद्रपूर येथे सैनिकी शाळा सुरू झाली आहे. या ठिकाणी वर्ग 6 वर्ग 9 साठी प्रवेश देणे सुरू आहे. राष्ट्रीय रक्षा अकादमी, भारतीय नौसेना अकादमी, अन्य सैनिक प्रशिक्षण अकादमीसाठी या सैनिकी शाळांमार्फत मुलांना प्रशिक्षित केले जाते. गेल्या 20 ऑक्टोंबर पासून ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

केंद्र शासनाने निर्देशित केल्यानुसार यामध्ये हे विविध गटासाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. वर्ग 6 व वर्ग 9 साठी प्रवेश दिला जाणार आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर 10 जानेवारीला प्रत्यक्ष मुलांची परीक्षा घेतली जाणार आहे. बहुपर्यायी स्वरुपातील हे पेपर असतील. वर्ग 6 मध्ये प्रवेश करण्यासाठी 31 मार्च 2021 रोजी मुलाचे वय दहा ते बारा वर्षाच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे. तर वर्ग नऊ मध्ये प्रवेश घेण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत 13 ते 15 वर्षाच्या आतमध्ये विद्यार्थ्यांचे वय असणे आवश्यक आहे. सैनिक शाळेमध्ये मुलींना केवळ सहाव्या वर्गातच प्रवेश दिला जातो. या परीक्षेसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी ४०० रुपये तर अन्य विद्यार्थ्यांसाठी 550 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या वेबसाईटवर https://aissee.nta.nic.in ही लिंक जाहीर करण्यात आली आहे. पालकांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेत सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर सैनिक शाळेचे प्राचार्य स्कॉडर्न लिडर नरेश कुमार यांनी केले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Featured

Copyright ©