धान खरेदी रखडणार
संजीव बडोले प्रतिनिधी नवेगावबांध दि.10 नोव्हेंबर:-
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील तलाठी डोये व मंडळ अधिकारी रहांगडाले तथा गोंदिया तालुक्यातील सैराट तलाठी दिवाकर शेट्टे यांना रेती अवैध प्रकरणात कोणतीही शहानिशा न करता अन्यायकारकपणे निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्यात यावे. या मागणीसह नवीन लॅपटॉप व प्रिंटर पुरविण्यात यावे, कोतवाल भरती करण्यात यावी, नवीन तलाठी व मंडळ कार्यालयाची निर्मिती करण्यात यावी, त्यावर पदस्थापना करण्यात यावी, अशा एकूण 21 मागण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्व 25 तलाठी व दोन मंडळ अधिकारी यांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. दिनांक 9 नोव्हेंबर रोज सोमवारला विदर्भ पटवारी संघ शाखा गोंदिया चे जिल्हा उपाध्यक्ष तलाठी पी.एस. कुंभरे, सहसचिव झलके तलाठी, तलाठी संघाचे अर्जुनी-मोर तालुका उपाध्यक्ष टेंभरे तलाठी, सचिव वैद्य तलाठी, तसेच दोन मंडळ अधिकारी यांच्यासह 25 तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत, तहसीलदार विनोद मेश्राम यांना सर्वांनी आपली डीएससी व निवेदन देऊन, असहकार आंदोलन पुकारले आहे. आंदोलनादरम्यान नैसर्गिक आपत्ती व निवडणुकीचे काम यासह कोणतेही काम तलाठी व मंडळ अधिकारी करणार नाही असे संघटनेच्या निवेदनातून सांगण्यात आले आहे. या असहकार आंदोलनाचा फटका मात्र तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. तलाठी व मंडळ अधिकारी हे महसूल विभागात जनता व शेतकरी यांना जोडणारा दुवा आहे. आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांनी आपल्या धान्याची साठवणूक करून ठेवली आहे. जोपर्यंत सातबारा वर पेरा नोंदविलेल्या याद्या, डिजिटल सातबारा तलाठ्याकडून शेतकऱ्यांना मिळणार नाही, तोपर्यंत धान खरेदीला प्रारंभ होणार नाही. याचा फार मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकरी राजा संकटात सापडला आहे.
Add Comment