यवतमाळ सामाजिक

हजारो लाडक्या बहिणींनी आमदार देवेंद्र भुयार यांना औक्षण करत बांधल्या राख्या

हजारो लाडक्या बहिणींनी आमदार देवेंद्र भुयार यांना औक्षण करत बांधल्या राख्या

सन्माननिधी खात्यावर जमा झाल्याने महिलावर्गामध्ये आनंदाचे वातावरण

वरूड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत गौरव सोहळा व रक्षाबंधन ऋणानुबंधन सोहळा हजारो लाडक्या बहिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गावपातळीवर शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याकरीता तसेच कोरोना महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता अवितरित सेवा देण्याकरीता वरुड तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा सेविका, माविम, उमेद, बँक सखी, महिला ग्रामसेविका यांनी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे या महिला कर्मचारी यांचा सत्कार सोहळा आणि ऋणानुबंध सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी वरूड तालुक्यातील असंख्य महिला भगिनींनी एकत्र येत आमदार देवेंद्र भुयार यांना राखी बांधत आनंदोत्सव साजरा केला.

महाराष्ट्र शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असुन यामध्ये पात्र लाभार्थी महिलांना दीड हजार रूपये सन्माननिधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय महिन्याभरापुर्वी घेतला होता.या योजनेचे मोर्शी वरूड तालुक्याचे पदसिद्ध अध्यक्ष हे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार आहेत. त्यांनी गेल्या महिनाभरापासून या योजनेचा लाभ तालुक्यातील पात्र,गरजु महिलांना मिळवून देण्यासाठी अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती.यामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणेला दिवस-रात्र कामाला लावुन या योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही अशा प्रकारच्या सक्त सुचना आमदार देवेंद्र भुयार यांनी केल्या होत्या. तसेच त्यांनी सर्व तालुका पिंजून काढत स्वतः प्रत्येक गावामध्ये जाऊन या योजनेचा प्रत्यक्ष आढावा घेत कागदोपत्री अडचणी सोडविण्यासाठी खूप‌ मेहनत घेतली होती.

त्याचीच फलश्रुती म्हणून मोर्शी वरूड तालुक्यातील तालुक्यातील हजारो महिलांच्या बॅंक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्माननिधी जमा होण्यास सुरवात झालेली आहे. ऐन रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला असंख्य महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे मिळून सुमारे तीन हजार रूपये जमा झाल्याने महिलावर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.

त्यामुळे वरूड तालुक्यातील हजारो महिलांनी एकत्र येत आमदार देवेंद्र भुयार यांना राखी बांधत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी उपस्थित भगिनींना संबोधीत करताना आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, आज खऱ्या अर्थाने तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघुन मला सुद्धा तुमच्यासाठी प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नाचे समाधान मिळाले असुन तुमचा लहान-मोठा भाऊ म्हणून नेहमीच तुम्हा सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे ऊभा राहणार असल्याची ग्वाही ही आ. देवेंद्र भुयार यांनी दिली.

तसेच उर्वरित भगिनींना सुद्धा लवकरच हा सन्माननिधी मिळणार असल्याचे सांगत अजुनही ज्यांनी या योजनेचा अर्ज भरला नाही त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरून घ्यावेत.त्याच बरोबर ज्या भगिनींचे आधारकार्ड बॅंक खात्याला लिंक नाहीत,त्यांनी त्वरित बॅंकेत जाऊन आपले आधारकार्ड लिंक करण्याचे आवाहन यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे.

Copyright ©