महाराष्ट्र यवतमाळ

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रम

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रम

50 हजार महिला उपस्थित राहणार

महिलांसाठी हजार बसेसची व्यवस्था

यवतमाळ, दि.20 (जिमाका) : महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत शनिवार दि.24 ऑगस्ट रोजी किन्ही, यवतमाळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. प्रशासनाच्यावतीने या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु असून जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी आज तयारीचा आढावा घेतला.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह सर्वच विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. किन्ही येथील मोकळ्या मैदानात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाभरातील 50 हजारावर महिला उपस्थित राहणार आहे. त्या अनुषंगाने विविध बाबींचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.

कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य मंडपाची उभारणी, तेथील बैठक व्यवस्था, स्टेज आदी कामांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर नेमून देण्यात आली आहे. कार्यक्रमास येणाऱ्या महिलांसाठी 1 हजार बसेसची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार आहे. बसेसचे नियोजन करण्याची सूचना एसटीच्या विभाग नियंत्रकास करण्यात आली. महिलांसाठी खाद्य पदार्थ, पिण्याचे पाणी आदींचे सविस्तर निर्देश देण्यात आले.

मोठ्या प्रमाणावर महिला येणार असल्याचे कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध अधिकाऱ्यांच्या प्रमुखतेत समित्यांचे गठण करण्यात आले आहे. समिती प्रमुखांना आपआपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी 100 मेडिकल टीम व 7 ॲम्बूलन्स राहणार आहे. महिलांसाठी पुरेशी फिरती स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहे.

कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरूपात काही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या अन्य काही योजनांचा लाभ वितरण करण्यात येणार आहे.

Copyright ©