यवतमाळ सामाजिक

माझा अर्जुन अखेर घरी परतला 

माझा अर्जुन अखेर घरी परतला

माऊलीचा आत्मविश्वास जिंकला ;अर्जुनाला घेण्यास करण आला

‘नंददीप’च्या मानसपुत्राची स्वगृही रवानगी

यवतमाळ : माझा अर्जुन एके दिवशी घरी परतेल हा प्रबळ आत्मविश्वास बाळगून त्याच्या प्रतीक्षेत दिवस काढणाऱ्या माऊलीचा विश्वास अखेर जिंकला. दहा वर्षांपूर्वी मानसिक असंतुलनामुळे अर्जुन हा घरून बेपत्ता झाला आणि करण-अर्जुन या भावंडांची जोडी फुटली. आर्णी पोलिसांसह कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध चालविली. अखेर एका वयोवृद्धेने त्याला ओळखल्याने तो आपल्या स्वगृही जाऊ शकला आहे. नंददीप फाउंडेशनचा पहिला मनोरुग्ण तसेच संदीप आणि नंदिनी यांचा मानसपुत्र असलेल्या एम सुरेश उर्फ पुष्करचे खरे नाव अर्जुन संजय अगलधरे असून १६ ऑगस्टला नंददीप येथे त्याचा रवानगी सोहळा पार पडला. त्याला निरोप देताना शिंदे दाम्पत्याला आपले अश्रू लपवता आले नाही.

संदीप शिंदे यांनी सुरु केलेल्या मनोरुग्णसेवेचा एम सुरेश उर्फ पुष्कर हा जिवंत साक्षीदार आहे. शिंदे यांनी ज्या मनोरुग्णाला पहिल्यांदा आधार दिला तो हाच अर्जुन आहे. आर्णी तालुक्यातील पाभळ हे त्याचे मूळगाव. शिंदे यांचे मामा रमेश धावतोडे यांच्या सौजन्याने १४ ऑगस्टला नंददीप मनोरुग्ण निवारा केंद्रात लोणबेहळ येथील आप्पास्वामी भजनी मंडळाचा भजनसंध्येचा कार्यक्रम पार पडला. याठिकाणी आचारी सिध्हू महाराजांसोबत आलेल्या पाभळ येथील आजीबाईने अर्जुनला पाहताक्षणी ओळखले. शरीर जरी क्षीण झाले तरी तिच्या तीक्ष्ण नजरेतून अर्जुन सुटला नाही. तिने ही वार्ता अर्जुनच्या भावाला कळविली तो आपल्या आईवडिलांसह बहीण आणि गावकऱ्यांना घेऊन नंददीप फाउंडेशन येथे पोहोचला. आपल्या अर्जुनाला पाहताच आई रुख्माबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. माझा अर्जुन मला परत मिळेल, हा माझा विश्वास अखेर खरा ठरला. संदीप आणि नंदिनीने माझ्या लेकाला आईवडिलांसारखे जपले त्यांची मी आयुष्यभर ऋणी आहे,अशा शब्दात तिने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. दहा वर्षांपूर्वी बंगळुरू येथे कॅटर्सच्या कामासाठी निघून गेलेला अर्जुन घरी परतलाच नव्हता. २० नोव्हेंबर २०२१ रोजी तो यवतमाळच्या वाघापूर परिसरात संदीप यांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्यास लगेच आधार देत त्याला आपल्या निवारा केंद्रात दाखल केले. याठिकाणी मनोविकार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांच्या उपचाराने त्याच्या मानसिक आरोग्यात हळूहळू सुधारणा होत गेली. केंद्रातील अन्य मनोरुग्णांवर लक्ष ठेवणे,बरे झालेल्या मनोरुग्णांची रवानगी करणे, बेघरांना भोजनाचे डबे पुरविणे,केंद्रातील लहानसहान कामे आणि सुरक्षेची जबाबदारी तो चोखपणे पाडत होता. त्याने शिंदे यांना भेटल्यावर आपले नाव एम. सुरेश उर्फ पुष्कर असे सांगितले होते ‘नंददीप’चे संदीप व नंदिनी यांच्या सहवासात सर्वाधिक वेळ अर्जुनाने घालविला. तो शिंदे यांच्या कुटुंबातील जणू सदस्यच बनला होता. त्यामुळे या दाम्पत्याला त्याचा लळा लागला. त्याला स्वगृही पाठविताना शिंदे दाम्पत्य व त्यांची मुलगी हर्षालीला अश्रू अनावर झाले. त्याला घरी नेण्यास अर्जुनचे वडील संजय,आई रुख्माबाई, भाऊ करण, बहीण मनीषा,पाभळचे प्रतिष्ठित व्यक्ती विनोद जाधव तसेच गावकरी आले होते. यावेळी नंददीपचे मार्गदर्शक निवृत्त मुख्याध्यापक नरेंद्र पवार,अनंत कौलगीकर,निशांत सायरे, कृष्णा मुळे कार्तिक भेंडे आदी उपस्थित होते. या केंद्रात आजपर्यंत ५८८ मनोरुग्णांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यापैकी ४७५ मनोरुग्णांना स्वस्थ करून त्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आजघडीला याठिकाणी ६३ पुरुष तर ५० महिला असे एकूण ११३ मनोरुग्ण उपचाराधीनअसून पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या निवाऱ्यामुळे नंददीपचे मनोरुग्ण सेवा कार्य सुरळीत सुरु आहे

मुख्याधिकारी माधुरी मडावींचा लाडका भाऊ

तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या प्रयत्नाने नंदादीप फाऊंडेशनला समर्थवाडीस्थित बंद पडलेली शाळा केंद्र चालवायला मिळाली. मडावी यांनी मनोरुग्ण एम.सुरेश उर्फ पुष्कर अर्थात अर्जुन याला भाऊ मानले आहे. आपल्या लाडक्या भावाला रक्षाबंधनाची भेट म्हणून  मडावी यांनी त्याच्यासाठी वस्त्र खरेदी केले होते. ही बहीण जेव्हा केव्हाही मनोरुग्ण निवारा केंद्रात यायची. त्यावेळी अर्जुन हा त्यांच्या वाहनामध्ये बसून फेरफटका मारण्यासाठी हट्ट करायचा पण त्याचा हा हट्ट बहिणीने नेहमीच पूर्ण केला. त्याची स्वगृही रवानगी होत असल्याचे कळताच बहिणीला समाधानाचा धक्का बसला. त्यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्याला पुढील संतुलित आयुष्यासाठीच्या शुभेच्छा दिल्या.

Copyright ©