यवतमाळ सामाजिक

नंददीप’च्या हस्ते मानवतेचं अतुलनीय कार्य- एसपी बनसोड

नंददीप’च्या हस्ते मानवतेचं अतुलनीय कार्य- एसपी बनसोड

सहकुटुंब नंददीप फाऊंडेशन येथे भेट

यवतमाळ : आपले घरदार सोडून नंदिनी आणि संदीप शिंदे यांच्या हस्ते सुरू असलेली मनोरुग्ण सेवा म्हणजे मानवतेचे अतुलनीय कार्य आहे,असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांनी केले.शुक्रवारी सायंकाळी त्यांनी सहकुटुंब येथे भेट दिली.

विशेष म्हणजे त्यांनी स्वतः मनोरुग्णांना सायंकाळचे जेवणही वाढले

पूर्वी अस्तित्वशून्य झालेल्या मनोरुग्णांना संतुलित जीवन देण्यासोबतच सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या नंददीप शहरी बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात ९ ऑगस्टच्या सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांनी पत्नी डॉ.स्नेहा व मुलगी अनाया यांच्यासमवेत भेट दिली. मनोरुग्ण सेवेचे कार्य कशाप्रकारे केले जाते त्यानंतर रुग्णांच्या आयुष्यात कसे बदल होतात.याविषयी त्यांनी जाणून घेतले.यावेळी डॉ.बनसोड म्हणाले की,आजच्या काळात आपले घरदार सोडून असे समाजकार्य कुणीही करत नाही,असे कार्य करण्यास प्रबळ अशी अंत:प्रेरणा असावी लागते आणि ती नंदिनी आणि संदीप या दाम्पत्यामध्ये आहे त्यामुळेच मनोरुग्ण सेवेचे कार्य अविरत सुरू असून यामागे लोकचळवळ उभी राहिली आहे.आमचे ३१ पोलीस ठाण्यातील सर्वच पोलीस तुमच्या या कार्यासोबत आहे,असा विश्वासही त्यांनी दिला.

याशिवाय १ हजार मनोरुग्णांची सोय होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासनही दिले.दरम्यान,अधीक्षकांनी मनोविकार तज्ज्ञ डॉ.श्रीकांत मेश्राम यांच्याशी दिलखुलास चर्चा केली.मनोरुग्णाचा शोध घेतल्यानंतर त्यांच्यावर वैद्यकीय आणि मानसोपचार कसे केले जातात,त्यांच्यात कशाप्रकारे सुधारणा होते आणि त्यांच्यात सकारात्मक बदल झाल्यानंतर त्यांच्यात स्व:भान विकसित होते का आणि असे झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा शोध लागून त्यांचे आपल्या घरी पुनर्वसन होते का अश्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी डॉ.मेश्राम यांच्याकडून जाणून घेतली.नंददीप फाऊंडेशनचे मार्गदर्शक, माजी विस्तार अधिकारी नरेंद्र पवार यांच्या रेकॉर्ड मेन्टेन ठेवण्याच्या कामाचे आणि मनोरुग्णांची दररोज कवायत घेणारे निवृत्त पोलीस कर्मचारी महेश कळसकर यांचेही त्यांनी विशेष असे कौतुक केले.या मनोरुग्णसेवा कार्याला पुढे नेणारे दानशूर व्यक्ती जमेल त्या पद्धतीने सहकार्य करणारे समाजबांधव,डॉक्टर्स आणि नंददीपच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली.

याप्रसंगी निवृत्त पोलीस महेश कळसकर,अनंत कौलगीकर,प्रशांत बनगीनवार, दीपक बागडी,डॉ. कविता बोरकर,दीपक घरझोडे यांच्यासह नंददीप फाऊंडेशनचे विक्की एकोणकार, प्रसाद बाजपेयी, कृष्णा मुळे, कार्तिक भेंडे, स्वप्निल सावळे, भोजराज गजबे, परिचारिका किशोरी मेश्राम,आरती घाडगे,कांचन केळकर उपस्थित होते.

Copyright ©