यवतमाळ सामाजिक

गुरूंचे खरे स्वरूप

गुरूंचे खरे स्वरूप

१. शिष्याचा विश्वास : ‘गुरु विश्वासावर आहे. आपल्या विश्वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्वासावर आहे. तुमच्या विश्वासातच गुरु आहे.

भावार्थ : ‘गुरु विश्वासावर आहे. आपल्या विश्वासावर गुरूंची महती अवलंबून आहे’, यातील गुरु हा शब्द बाह्यगुरूंविषयी वापरलेला आहे. गुरूंवर विश्वास असेल तरच गुरु हे ‘गुरु’ म्हणून कार्य करू शकतात. ‘गुरु तुमच्यापण विश्वासावर आहे. तुमच्या विश्वासातच गुरु आहे’, यातील गुरु हे अंतर्यामी असलेले गुरु होत.’

२. गुरुतत्त्व एकच : सर्व गुरु जरी बाह्यतः स्थूलदेहाने निराळे असले, तरी आतून मात्र ते एकच असतात. ज्याप्रमाणे गायीच्या कोणत्याही आचळातून सारखेच शुद्ध आणि निर्मळ दूध येते, त्याचप्रमाणे प्रत्येक गुरूंमधील गुरुतत्त्व एकच असल्याने त्यांच्याकडून येणार्‍या आनंदलहरी सारख्याच असतात. समुद्राच्या लाटा जशा किनार्‍याकडे येतात, तसेच ब्रह्म / ईश्वर यांच्या लाटा, म्हणजे गुरु, समाजाकडे येतात. सर्व लाटांतील पाण्याची चव जशी तीच असते, तसेच सर्व गुरूंतील तत्त्व एक म्हणजे ब्रह्मच असते. पाण्याच्या टाकीला लहान-मोठ्या बर्‍याच तोट्या असल्या, तरी प्रत्येक तोटीतून टाकीतीलच पाणी येते. विजेचे दिवे कितीही निरनिराळ्या आकाराचे असले, तरी वहाणार्‍या विजेमुळे निर्माण होणारा प्रकाशच त्यांतून बाहेर पडतो. तसेच गुरु बाह्यतः निरनिराळे दिसले तरी त्यांच्यातील गुरुतत्त्व, म्हणजेच ईश्वरीतत्त्व एकच असते.

गुरु म्हणजे स्थूलदेह नव्हे. गुरूंना सूक्ष्मदेह (मन) व कारणदेह (बुद्धि) नसल्याने ते विश्वमन आणि विश्वबुद्धीशी एकरूप झालेले असतात; म्हणजेच सर्व गुरूंचे मन अन् बुद्धि हे विश्वमन आणि विश्वबुद्धि असल्याने ते एकच असतात.

Copyright ©