यवतमाळ सामाजिक

पिंपळगाव (डुब्बा) च्या सरपंच पदावर टांगती तलवार !

पिंपळगाव (डुब्बा) च्या सरपंच पदावर टांगती तलवार !

अतिक्रमणाला पाठबळ देणे येणार अंगलट !

अप्पर आयुक्तांनी मागविला मुख्य कार्यकारी अधिका-यांचा अहवाल

नेर तालुक्यातील स्थानिक पिंपळगाव (डुब्बा) येथील सरपंच प्रशांत नारायण देवकते महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये विहित केलेले आपले कर्तव्य करण्याबाबत दुर्लक्ष केल्याबद्दल व आपले कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थता दर्शवुन आपली कर्तव्ये पार पाडण्यात दुराग्रहाने हेळसांड केल्याप्रकरणी जानराव बापुराव तलवारे व इतर यांनी मा. अप्पर आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या न्यायालयात धाव घेतली आहे. प्रस्तुत प्रकरणी मा. अप्पर आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद, यवतमाळ यांचा अहवाल मागवला आहे. सदर प्रकरणामुळे पिंपळगाव (डुब्बा) च्या सरपंचांचे पदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जानराव तलवारे यांनी वारंवार तोंडी व लेखी पत्रव्यवहार करुनही अर्जदार व ग्रामपंचायत पिंपळगाव (डुब्बा) चे अंतर्गत रस्त्यावर श्री. भारत भिमराव चौरे (चवरे) व श्री. सुरेश भिमराव चौरे (चवरे) यांनी केलेले बेकायदेशीर अतिक्रमण सरपंच प्रशांत नारायण देवकते यांनी अतिक्रमण धारकांशी असलेले वैयक्तिक व आर्थिक हितसंबंधाचे कारणावरून सचिवांना प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण निष्काषित करण्यास हेतुपुरस्पर अडथळा निर्माण करुन अधिनियमाद्वारे विहित केलेली सरपंच पदाची कर्तव्ये पार पाडण्यात कसूर केला होता. म्हणून जानराव बापुराव तलवारे व इतर यांनी महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम, १९५९ च्या कलम ३९ (१) नुसार सरपंच प्रशांत नारायण देवकते यांनी आपले कर्तव्य करण्याबाबत दुर्लक्ष केल्याबद्दल व आपले कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थता दर्शवुन आपली कर्तव्ये पार पाडण्यात दुराग्रहाने हेळसांड केल्याप्रकरणी त्यांना सरपंच पदावरुन काढून टाकण्याची कार्यवाही करणेकरीता मा. अप्पर आयुक्तांचे न्यायालयात दिनांक ०५ मार्च २०२४ रोजी अर्ज दाखल केलेला आहे.

जानराव तलवारे यांचे अर्जावर मा. अप्पर आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद, यवतमाळ यांचा अहवाल मागवला असुन अतिक्रमणाला पाठबळ दिल्याने आता खुद्द प्रशांत देवकते यांच्या सरपंच पदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. प्रस्तुत प्रकरणात अर्जदारांचे वतीने अ‍ॅड. निखिल सायरे यांनी बाजु मांडली. या प्रकरणाकडे सर्व पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.

Copyright ©