यवतमाळ सामाजिक

कीर्तन महोत्सव आयोजन समिती यवतमाळ तफे भव्य कीर्तन महोत्सव

कीर्तन महोत्सव आयोजन समिती यवतमाळ तफे भव्य कीर्तन महोत्सव

पूज़्य अंबिका आई, बोपापुर निवासी यांचे शुभहस्ते कीर्तन महोत्सव उद्घाटन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न

“सत्कार्यात दातृत्वाची भावना म्हणजे ईश्वरीय कार्य !” पूज्य अंबिका माता.

“राम म्हणत म्हणत रामरूप व्हा” ह.भ.प. शास्त्र वरदगांवकर

यवतमाळ (का.प्र.)

कीर्तन महोत्सव समिती द्रारा आयोजित १६ व्या कीर्तन महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बोपापूर निवासी पूज्य अंबिका आई यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. भव्य सभामंडप, आकर्षक सजावट, ख्यातनाम कीर्तनकरांची मांदीआळी, मान्यप्राप्त वाद्यवृंद असा हा दैदीप्यमान कीर्तन महोत्सव यवतमाळ शहराचे भूषण होय. या सोहळ्याची भव्यता ही यवतमाळकरांच्या दातृत्त्वाची पावती होय. आणि अशा या “सत्कार्यात दातृत्त्वाची भावना म्हणजे ईश्वरीय कार्य होय.” या दर्शनीय सोहळ्यास मी वंदन करते. आयोजकांना आशीर्वाद देते, विशेषत: असेच भगवतकार्य आपल्या हातून यापूढे किमान २१ वर्षे सतत घडो अशी माँ भवानी चरणी प्रार्थना करते. असे आशीर्वादपर वक्तव्य करून त्यांनी या सोहळ्याचे उद्घाटन केले. अरूंधती भिसे यांनी सुमधुर स्वरात शारदास्तवन सादर केले. साथसंगत सुनिल गुल्हाने यांनी केली.

या प्रसंगी व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष सुरेश पिल्यवार, सचिव अरूण भिसे, सहसचिव डॉ. सुशील बत्तलवार, वसंत बेडेकर, बालाजी मंदिराचे अध्यक्ष विनोद देशपांडे उपस्थित होते. प्रास्तविकपर भाष्य करतांना अरूण भिसे यांनी भावनाप्रधान स्थितीत आश्रयदात्यांना,सहकार्यांना धन्यवाद दिले. अध्यक्ष सुरेश कैपिल्यवार यांनी साशृनयनांनी अंबिका आई प्रती कृतज्ञता व्यक्त करून ७६ व्या वर्षी सुद्धा आईच्या आशीर्वादाने मी १६ व्या वर्षाची अनुभूती अनुभवत आहे. कृपा असू द्या. पुढील २१ वर्षे मी हे कार्य करीत राहणार असा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सर्वांगसुंदर सूत्र संचालन स्मिताताई भोयटे यांनी केले.

कीर्तन महोत्सवात प्रथम कीर्तन पुष्प ह.भ.प. भगवान शास्त्री वरदगांवकर यांनी सादर केले. वारकरी परंपरेतील कीर्तना करिता संत श्रेष्ठ तुकोबाराया यांच्या “एक गावे आम्ही विठोबाचे नाम ! आणिकांचे काम नाही आता ।।” या अभंगाचे निरूपण करतांना ते म्हणाले, भगवंताच्या नामाप्रती निष्ठा प्रगट करणारा हा अभंग…. विठ्ठलाच्या नावाची महती वर्णन करणारा हा अभंग……. भक्तीभाव निर्माण करणारा हा अभंग भक्तीमार्गाचा दीपस्तंभ होय. आपल्या नावात येवढी मोठी शक्ती आहे याची कल्पना श्रीरामांना सुद्धा नव्हती…. ती नल, निलांना होती, हनुमंताला होती आणि म्हणूनच त्यांनी रामसेतू निर्माण केला.हनुमंतांनी जय श्रीराम म्हणत समुद्र लंघन केले. म्हणून संत म्हणतात., तुझ्या नामाचा महिमा !तुज नकळे निगमागमा ।। राम गावा राम ध्यावा । राम जीवीचा विसावा।। ईश्वरप्राप्तीचा एकच मार्ग “राम म्हणत म्हणत रामरूप व्हा !” असा सरळ सोपा उपदेश ह. भ.प. भगवान शास्त्री वरदगांवकर यांनी कीर्तन महोत्सवातील प्रथम पुष्प गुंफतांना केला. संवादीनीवर गंगाधर देव यांनी, तर श्रीधर कोरडे मृदंगावर यांनी अत्यंत सुंदर साथ दिली साथीला गायनाचार्य अशोक इंगळे, सुधाकर दांदडे, गणेश निमजे, गोडबोले, अनिल राऊत, अरूण हर्षे, कदम, देवतळे, चौधरी,शुभम सुभेदार, दीपक वालवलकर, रउमेश सुलभेवार यांनी कीर्तनात रंग भरला

आरतीचे यजमानपद अरूण बीडकर, बंडुभाऊ कदम, किशोर कारिया, अशोक सिंघानिया यांनी भूषविले.

Copyright ©