Breaking News यवतमाळ

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

उमरखेड प्रतिनिधी -: अर्चना भोपळे


शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोणदरी ता.पुसद येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केली.मी कर्जामुळे कंटाळून आत्महत्या करीत आहे असे लिखाण केलेली चिठ्ठी त्यांच्या खिशात आढळून आली. मृत शेतकरी फकिरराव चंद्रभान बोलके वय ५० यांनी शुक्रवारी सकाळी पाचच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आपले जीवन संपविले.बोलके यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती असून, त्यांच्या उपजीविकेचे शेती हे एकमेव साधन होते. मात्र शेतीवर उपजीविका भागत नसल्याने ते रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत होते, तसेच शेतीवर घेतलेले कर्ज फेडण्यात अपयश येत असल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे फकिरराव बोलके हे चिंताग्रस्त झाले होते. हाती येणारे उत्पन्न अत्यंत कमी, शेती उत्पादनांना भाव नाही, अशी अनेक संकट समोर असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते चिंताग्रस्त झाले होते.
अखेर हताश होऊन त्यांनी जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. लोणवाडी गावात कष्टकरी शेतकऱ्यांची अशा पद्धतीने आत्महत्या झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत शेतकरी फकिरा बोलके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले एक मुलगी आहे.शेतकरी आत्महत्या झाल्याची माहिती पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक ढोमने यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक राजेश पंडित,जमादार किसन राठोड,समाधान नरवाडे यांना पाठवले पोफाळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना साठी उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.

Copyright ©