यवतमाळ सामाजिक

पीक विमा नुकसानभरपाई, रोगराई आणि अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना विशेष मदत देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश

पीक विमा नुकसानभरपाई, रोगराई आणि अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना विशेष मदत देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश

पालकमंत्री संजय राठोड यांच्या पत्राची मुख्यमंत्र्यांकडून गांभीर्याने दखल

यवतमाळ, दि.21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून नुकसानभरपाईची अत्यल्प रक्कम मिळाली असून त्यांना नुकसानाप्रमाणे सन्मानजनक नुकसानभरपाईची रक्कम द्यावी आणि रोगराई व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानासाठी विशेष मदत देण्याची मागणी पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. पालकमंत्र्यांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या 8 लाख 44 हजार 757 एवढी आहे. त्यापैकी 5 लाख 25 हजार 541 शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत पीक विमा कंपनीस पूर्वसूचना दिलेली आहे. परंतु त्यापैकी केवळ 59 हजार 404 म्हणजेच केवळ 11 टक्के शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली आहे. त्यातही 9 हजार 727 शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेक्षाही कमी, तर 78 शेतकऱ्यांना तर 10 रुपये इतकी कमी रक्कम दिली आहे. त्यामुळे पीकविमा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांतून तीव्र नाराजीच्या भावना व्यक्त होत आहेत, असे पालकमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीप्रमाणे सन्मानजनक नुकसानभरपाईची रक्कम देण्याबाबत व उर्वरित सर्व नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांनासुध्दा त्वरित पीक विम्याची रक्कम अदा करण्याबाबत निर्देशित करावे, अशा मागणीचे पत्र पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

तसेच जिल्ह्यात रोगराईमुळे व अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी विशेष मदत जाहीर करण्याची मागणी पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Copyright ©