यवतमाळ सामाजिक

भाजी मंडीमध्ये मोबाइल चोरट्यांचा हैदोस

भाजी मंडीमध्ये मोबाइल चोरट्यांचा हैदोस

– एकाच दिवशी चोरले 8 ते 10 मोबाईल, पोलिसांसह बाजार समितीचेही दुर्लक्ष, मंडी प्रशासनाचे वसुलीवरच लक्ष

यवतमाळ: शहरातील विठ्‌ठलवाडी पिंपळगाव येथील भाजी मंडीमध्ये मोबाइल चोरट्यांनी हैदोस घतला असून गर्दीचा फायदा घेवून हे चोरटे येथे भाजी खरेदीकरीता आलेल्या नागरीकांचे महागडे मोबाइल लंपास करतात. रविवार 29 ऑक्टोंबरला सकाळी 8 ते 10 नागरिकांचे मोबाइल या भाजी मंडीमधून चोरटयांनी लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची तक्रार नागरीकांनी यवतमाळ शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. एकाच दिवशी एकाच परिसरात आठ ते दहा मोबाइलची चोरी झाल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मोबाइल चोरट्यांचा बंदोबस्त पोलीसांनी त्वरीत करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. भाजी मंडी परिसरातून वारंवार नागरीकांचे मोबाइल चोरी जात असल्याच्या तक्रारी बाजार समिति संचालक मंडळ आणि जिल्हा पोलीस प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. बाजार समिती भाजी मंडीमध्ये येणा-यांकडून गेटवरच एन्ट्री फी वसुल करीत आहे. परंतु येथे नागरीकांच्या सुरक्षेची मात्र बोंब आहे. भाजी मंडीमध्ये मोबाइल चोरट्यांना आवरण्यात बाजार समिति कसलीही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येत आहे. येथील सुरक्षा रक्षकांनाही नागरीकांकडून पैसे वसुल करण्याच्या कामी लावण्यात आले आहे, याच सुरक्षा रक्षकांनी भाजी मंडीमध्ये गस्त दिली तर चोरट्यांना थोडा तरी धाक राहील असेही मत नागरीकांनी व्यक्त केले आहे. तसेच पोलीसांनीही नागरीकांच्या मोबाइल चोरीच्या तक्रारीचे गांभीर्य ओळखून खास करून रविवारी सकाळच्या सुमरास भाजीमंडीमध्ये गस्त द्यावी अशी मागणी होत आहे. तसेच हे चोरीचे मोबाइल शहरातील कोणता मोबाइल विक्रेता घेतो याचाही तपास होणे जरूरी आहे. या परिसरातील लोकप्रतिनीधींनीही नागरीकांच्या समस्यांची जाण ठेवून याबाबतचे गांभीर्य ओळखून संबधित विभागाला समज द्यावी अशी मागणी होत आहे.

Copyright ©