यवतमाळ सामाजिक

13 ऑक्टोबरचा रोजगार मेळाव्या पुढे ढकलला,आस्थापनांना ऑनलाईन सुविधा

13 ऑक्टोबरचा रोजगार मेळाव्या पुढे ढकलला,आस्थापनांना ऑनलाईन सुविधा

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिर!

यवतमाळ, दि.11 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ अंतर्गत मॉडेल करीयर सेंटरमार्फत दि.13 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला पं. दीनदयाळ उपध्याय रोजगार मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्याचे आयोजन जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय जवळ, तुळजापूर हायवे लगत, गट नं. 109 किन्ही, यवतमाळ येथे शासन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत करण्यात आलेले होते.

हा रोजगार मेळावा काही अपिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला असून रोजगार मेळाव्याची सुधारित दिनांक व ठिकाण कळविण्यात येईल, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त वि. सा शितोळे यांनी केले आहे.

सर्व खाजगी, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांना

ईआर प्रपत्र सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा

यवतमाळ, दि. 11 : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पूरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाईन मिळणार असून त्यासाठी rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक किंवा आस्थापनांनी सेवायोजन कायद्यान्वये त्रैमासिक रोजगार परतावा (ईआर 1) ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे.

जुलै ते सप्टेंबर अखेर संपणाऱ्या त्रैमासिकासाठी ईआर 1 या प्रपत्राची माहिती रोजगार महास्वयम या संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकिय, खाजगी उद्योजक किंवा आस्थापना यांनी त्यांचे युझर आय डी व पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करून ऑनलाईन सादर करावे व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावे. ऑनलाईन ईआर 1 सादर करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा दूरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४३९५ यावर संपर्क साधावा. ईआर 1 प्रपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत आहे.

ईआर 1 ऑनलाईन सादर न करणाऱ्या कसूरदार आस्थापनावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त वि.सा.शितोळे यांनी केले आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत शिबीर

विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र एकाच ठिकाणी मिळणार

महागाव, दारव्हा, वणी आणि पुसद उपविभागात शिबिराचे आयोजन

यवतमाळ, दि. 11 : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत महागाव, दारव्हा, वणी आणि पुसद या उपविभागात शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. या शिबिरात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात बारावी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पात्र अर्जदार विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न समिती करणार आहे.

दि. 12 ऑक्टोबर रोजी महागाव आणि उमरखेड तालुक्यासाठी मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महागाव येथे शिबीर होणार आहे. दि.19 ऑक्टोबर रोजी दिग्रस, नेर आणि दारव्हा तालुक्यासाठी शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, दारव्हा येथे शिबीर होईल. मारेगाव आणि वणी तालुक्यासाठी दि. 26 ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे शिबीर होईल. पुसद आणि दिग्रस तालुक्यासाठी दि. 2 नोव्हेंबर रोजी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसद येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराच्या ठिकाणी बारावी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेला अर्ज सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत सादर करावा. या शिबिरात जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सन 2023-24 मधील 12 विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांनी बार्टीच्या https://bartievalidity.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा उपयोग करुन परिपूर्ण भरलेला अर्ज व मुळ कागदपत्रासह उपस्थ‍ित राहावे. अर्जदाराचा जातीचा दाखला यवतमाळ जिल्ह्यातील असावा. अर्जदार हा अनुसूचित जाती (एसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती (व्हीजेएनटी), विशेष मागासवर्ग (एसबीसी) व इतर मागासप्रवर्ग (ओबीसी) याच प्रवर्गाचे अर्ज समितीकडून स्वीकारले जातील व त्यांची पडताळणी केली जाईल.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेशी संपर्क करावा. ज्या विद्यार्थीचे अर्ज परिपूर्ण असतील त्या विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून देण्याचा मानस समितीचा आहे. परिपूर्ण अर्जासाठी आवश्यक असलेले कागदपत्र व पुराव्याच्या यादीसाठी जिल्हा प्रशासनाच्या https://yavatmal.gov.in/notice_category/announcements/ या संकेतस्थळावर भेट देवून त्यानुसार कागदपत्रे सादर करावी.

यवतमाळ जिल्ह्यातील एकही विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेशापासून वंचित राहू नये हा या शिबीराचा मुळ उद्देश आहे. ही शिबिरे प्रत्येक उपविभागात एक याप्रमाणे आयोजित केलेली असून या शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होवून आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यवतमाळद्वारे करण्यात आले आहे.

Copyright ©