यवतमाळ शैक्षणिक

‘स्वच्छता अभियान व वृक्षारोपण’ द्वारे गांधीजी व शास्त्रीजीना सुसंस्कारतर्फे अनोखी आदरांजली.

‘स्वच्छता अभियान व वृक्षारोपण’ द्वारे गांधीजी व शास्त्रीजीना सुसंस्कारतर्फे अनोखी आदरांजली.

महात्मा गांधी व शास्त्रीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंघानिया नगरस्थित सुसंस्कार विद्या मंदिर शाळेत १ व २ ऑक्टोबर रोजी “स्वच्छ भारत कि स्वछानजली” या उपक्रमांतर्गत ‘प्रयास वन’ यवतमाळ येथे भेट देऊन ‘स्वच्छता व वृक्षारोपण अभियानाद्वारे’ सत्य,अहिंसा व स्वच्छतेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व संपूर्ण भारताला ‘जय जवान, जय किसान’ चा नारा देणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सुसंस्कार विद्या मंदिर शाळेत दरवर्षी महापुरुषांच्या विचाराने प्रेरित विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जाते. त्यानिमित्ताने या वर्षीसुद्धा शाळेतील ‘रेड हाऊस’ व ‘येलो हाऊस’ गृहाच्या विद्यार्थ्यांनी दिनांक १ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथील ‘प्रयास वन’ ला भेट देऊन ‘स्वच्छता व वृक्षारोपण अभियानाचा’ चा ध्यास घेऊन गांधीजी व शास्त्रीजीं यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली तसेच स्वच्छतेचा संदेश दिला. संस्थेचे सचिव श्री. संजय कोचे व मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी ‘प्रयास’ वनाला भेट देऊन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय कावलकर व मंगेश खुने यांच्याकडून ‘प्रयास फाउंडेशनची’ ध्येय व उद्दिष्टे व तेथील विविध वृक्षांची महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली.

त्याबरोबर विद्यार्थ्यांनी प्रयास वनातील परिसर स्वच्छ करून वृक्षारोपण केले. प्रयास वनातील स्वच्छता मोहीम व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबर रोजी शाळेत महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजींच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री.संजय कोचे व मुख्याध्यापिका उषा कोचे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. सर्वप्रथम गांधीजी व शास्त्रीजीं यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रास्ताविकेने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यानंतर इयत्ता ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी भाषणांच्या माध्यमातून गांधीजी व शास्त्रीजीं यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी ‘साबरमती के संत तूने कर दिया कमाल ‘ या गाण्याच्या सुंदर सादरीकरणाद्वारे उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणाद्वारे संस्थेचे सचिव संजय कोचे यांनी गांधीजी व शास्त्रीजीं यांच्या जीवनाचा वसा पुढे चालवण्यासाठी, त्यांच्या गुणांचा अंगीकार करून जीवनामध्ये यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला. मुख्याध्यापिका उषा कोचे यांनी गांधीजी व शास्त्रीजी यांच्या योगदानाचे महत्व विशद केले. अशाप्रकारे शाळेत गांधीजी व शास्त्रीजीं यांची जयंती अतिशय उत्साही वातावरणात साजरी करून आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ९ वी ची इशिता पावडे व दिव्या भांबेरे हिने केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन इयत्ता १० वी मधून अनुक्रमे क्षितिज डेहनकर व कु.क्रिष्णा चोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Copyright ©