यवतमाळ सामाजिक

शासन आपल्या दारी अभियान

शासन आपल्या दारी अभियान

अनेक महत्वाच्या बातम्या सह

६६ हजार शेतकऱ्यांना २५३ कोटींचे प्रोत्साहन अनुदान

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ

यवतमाळ, दि.१३ : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन मिळावे यासाठी अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान या योजनेंतर्गत दिले जाते. या योजनेतून जिल्ह्यातील ६६ हजार ८०६ शेतकऱ्यांना २५३ कोटी ७२ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर लाभाचे वितरण ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमादरम्यान करण्यात आले आहे.

या योजनेचा शुभारंभ ऑक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आला होता. शेती व शेतीशी निगडीत कामांकरिता शेतकरी व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. सन २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृश परिस्थती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. काही भागात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नव्हती. परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे शेती कामासाठी नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. शेतकऱ्यांची परिस्थिती विचारात घेऊन ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली.

पिककर्जाची उचल करुन नियमितपणे मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिलासा व प्रोत्साहन मिळावे यासाठी अशा पात्र शेतकऱ्यांना ५० हजाराचे अनुदान कर्जमुक्ती योजनेतून दिले जात आहे. या प्रोत्साहनपर योजनेंतर्गत आर्णी तालुक्यातील ५ हजार ८७५ शेतकऱ्यांना २१ कोटी ६५ लाख, बाभूळगाव तालुक्यातील २ हजार ५७३ शेतकऱ्यांना १० कोटी २० लाख, दारव्हा २ हजार २७६ शेतकऱ्यांनी ९ कोटी ४४ लाख, दिग्रस ४ हजार ९१६ शेतकऱ्यांना १७ कोटी ५० लाख, घाटंजी ३ हजार ६३१ शेतकऱ्यांना १४ कोटी ७२ लाख, कळंब १ हजार ९४३ शेतकऱ्यांना ८ कोटी ४४ लाख, केळापूर २ हजार ५५५ शेतकऱ्यांना ११ कोटी ४६ लाख, महागाव ३ हजार ७१० शेतकऱ्यांना १२ कोटी ६९ लाखाचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे.

मारेगाव तालुक्यातील ३ हजार ८५१ शेतकऱ्यांना १६ कोटी २५ लाख, नेर २ हजार २२३ शेतकऱ्यांना८ कोटी २७ लाख, पुसद ९ हजार १८६ शेतकऱ्यांना २७ कोटी ९३ लाख, राळेगाव ४ हजार ३०९ शेतकऱ्यांना १७ कोटी २१ लाख, उमरखेड ७ हजार ७६२ शेतकऱ्यांना २६ कोटी ८०, वणी ७ हजार १४९ शेतकऱ्यांना ३१ कोटी ८१ लाख, यवतमाळ २ हजार ९४ शेतकऱ्यांना ८ कोटी १७ लाख आणि झरी जामणी तालुक्यातील २ हजार ७५३ शेतकऱ्यांना ११ कोटी १२ लाख असे एकूण ६६ हजार ८०६ नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५३ कोटी ७२ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आले आहे.

नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८, सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. सन २०१९ मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा या योजनेस पात्र होते. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारससुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र ठरविण्यात आले.

बेरोजगार युवकांना रोजगारासाठी रविवारी इंडस्ट्री मिट

कौशल्य केंद्रे आपल्या दारी

यवतमाळ, दि.१३ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी 17 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता गुरुनानक भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसर, नागपूर येथे इंडस्ट्री मिट आयोजित करण्यात आली आहे. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थ्‍ित राहणार आहे.

या कार्यक्रमात “कौशल्य केंद्रे आपल्या दारी” या संकल्पनेतून नागपूर आणि अमरावती प्रशासकीय विभागातील संपूर्ण जिल्ह्यातील विविध नामांकित उद्योग, उद्योजक संघटना व प्लेसमेंट एजन्सीज सहभागी होणार आहे. जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना, उद्योजक, मोठे हॉटेल्स, मॉल्स, प्लेसमेंट एजन्सीज, सिक्युरिटी एजन्सी यांना आवश्यक कुशल, अकुशल मनुष्यबळ विनामूल्य उपलब्ध करणे, उमेदवारांना रोजगार मिळण्यासाठी शासन आणि उद्योग समूह यांच्यात सामंजस्य व समन्वय साधणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

जिल्ह्यातील उद्योजक व औद्योगिक संघटना, मोठे हॉटेल्स, मॉल्स व बेरोजगार उमेदवारांनी या “इंडस्ट्री मिट” चा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त वि. सा. शितोळे यांनी केले आहे.

शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी

क्रीडा संघटनांची सभा 14 सप्टेंबरला

यवतमाळ,दि.13 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषदे द्वारा आयोजित दरवर्षी विविध शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी सुद्धा विविध शालेय शासकीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

यंदाच्या सत्रातील क्रीडा स्पर्धा आयोजनाकरिता जिल्ह्यातील विना अनुदानित खेळ प्रकाराच्या संघटनांची पदाधिकाऱ्यांच्या सभेचे 14 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोधनी रोड, यवतमाळ येथे सकाळी 11. 30 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे.

या सभेस संघटनेचे अध्यक्ष, सचिव, सदस्य व पदाधिकाऱ्यांनी संघटनेची घटना व नोंदणी प्रमाणपत्र, राज्य संघटनेची संलग्नता (चालू वर्षाची), खेळाची नियमावली व दस्तऐवज घेऊन उपस्थित रहावे. या वर्षातील विविध स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करावयाचे असल्याने या सभेस संघटनेचे अध्यक्ष, सचिव, सदस्य इत्यादींची वरील दस्तऐवजासह उपस्थिती अनिवार्य राहील. त्या शिवाय जिल्हास्तरीय स्पर्धा ऑनलाइन कार्यक्रमात समावेश करण्यात येणार नाही व त्या खेळाची नोंद न झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संघटनेची राहील, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले

प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी अर्जातील त्रूटी पूर्ण करण्याचे आवाहन

महाऊर्जाच्या कुसुम पोर्टलवर १२ हजार ५३६ अर्ज प्राप्त

यवतमाळ, दि. 13 : महाकृषी ऊर्जा अभियानाच्या प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना अर्जातील त्रूटी पूर्ण करण्याचे आवाहन महाऊर्जातर्फे करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत महाऊर्जाच्या कुसुम पोर्टलवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे एकूण १२ हजार ५३६ अर्ज ऑनलाईनरित्या प्राप्त झालेले आहेत. या अर्जापैकी १ हजार ८३७ लाभार्थी शेतकऱ्यांनी सौर पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसेच एकूण १२ हजार ५३६ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी २ हजार ६२६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये कागदपत्रांची त्रुटी आढळलेली असल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित यादीमध्ये आहेत. या सर्व लाभार्थ्यांना कुसुम पोर्टलवरुन त्यांच्या भ्रमणध्वनीवर एसएमएस पाठविण्यात आलेले आहेत. तसेच महाऊर्जाच्या जिल्हा कार्यालयाकडून सर्व लाभार्थ्यांना कागदपत्रांची त्रुटी पूर्ण करण्याकरिता भ्रमणध्वनीव्दारे कळविण्यात आलेले आहे, तरी सुध्दा अद्यापपर्यंत लाभार्थ्यांकडून त्रुटींची पुर्तता करण्यात आलेली नाही.

या अनुषंगाने सर्व त्रुटी युक्त अर्ज असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या जिल्हा कार्यालय येथे कार्यालयीन ०७२३२२४९१५० क्रमांकावर संपर्क करुन आपल्या अर्जामध्ये असलेल्या कागदपत्रांच्या त्रुटींबाबत विचारणा करावी व प्राप्त मार्गदर्शनानुसार त्रुटी पूर्तता करुन घ्यावी किंवा शेतकऱ्यांना मिळालेल्या युजर नेम व पासवर्डचा उपयोग करुन ऑनलाईन पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन कागदपत्रांची त्रुटी पूर्तता करावी. यासाठी महाऊर्जाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. जे लाभार्थी दि. २४ सप्टेंबर २०२३ पर्यंत त्रुटी पूर्तता करणार नाही त्यांचे अर्ज निकाली काढण्यात येतील. मान्यता मिळाल्यास भविष्यात त्यांच्या अर्जाचा क्रम त्रुटी पूर्तता करणान्यास प्रथम प्राधान्य या अनुषंगाने गणला जाईल, असे आवाहन महाऊर्जातर्फे करण्यात आले आहे.

Copyright ©