Breaking News यवतमाळ

अखेर प्राध्यापकावर गुन्हे दाखल पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देणे पडले महागात 

प्रतिनिधी आशिफ खान

अखेर प्राध्यापकावर गुन्हे दाखल पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देणे पडले महागात 

आर्णी पंचायत समिती अंतर्गत मौजा माळेगांव येथे जिल्हा परिषद शाळा असून सदरील शाळेमध्ये एक ते सात वर्ग आहेत. शाळेची पटसंख्या 132 एवढी असताना सुद्धा मागील काही वर्षांपासून काही वर्ग गावातील प्राध्यापक किशोर बुटले यांच्या घरांमध्ये भरत आहे. गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या मार्गी लागव्या या उद्देशाने गावातील काही सुज्ञ नागरिकांनी हा प्रकार पत्रकार राम पवार यांच्या निदर्शनास आणून दिला. त्या अनुषंगाने सदर समस्येला वाचा फोडण्याकरिता दिनांक २५ ऑगस्ट रोजी राम पवार यांनी वृत्तांकन करून संबंधित बातमी एक वृत्तपत्रातून प्रकाशित झाली होती. याबाबत स्थानिक सुज्ञ नागरिकांनी त्यांना मदत केली. मात्र वृत्त प्रकाशित होताच संबंधित घर मालकाने नाहक बदनामी केल्याचा आरोप करून राम पवार यांना गाठून जातीवाचक शिवीगाळ करून जीवानिशी मारण्याची धमकी दिली. त्यानुसार पत्रकार राम पवार यांनी संबंधित प्राध्यापक किशोर बुटले यांच्या विरोधात तक्रार केली असून त्यांच्यावर भादंवी 504, 506 दाखल करण्यात आले. तसेच राम पवार यांच्या विरोधात दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यासंदर्भात तहसीलदार आर्णी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना लिखित निवेदन देण्यात आले व प्रेस क्लब सावळी सदोबा या पत्रकार संघटनेकडुन उपविभागीय अधिकारी पांढरकवडा यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे. परिसरातील अनेक पत्रकार संघटनांनी पत्रकारावर झालेल्या खोट्या गुन्ह्याचा निषेध करत पत्रकारांवर थेट कारवाई करण्याआधी शहानिशा करूनच गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरोळे,जाफर शेख,अरिफ शेख,सुरेश राठोड,रमेश राठोड, दुर्गेश कर्नेवार,नौशाद अली, प्रतीक मुनेश्वर,करण शेलकर,इरफान रजा,अविनाश चव्हाण,धनराज पवार,सह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

वार्ताहरांचा वाली कोण?

कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता जीवचा आटापिटा करून वार्ताहर वृत्तपत्राच्या अपेक्षा पूर्ण करतात. अगदी जाहिराती पासून तर वृत्तांसाठी त्याच्या मागे सतत तगादा लावण्यात येतो. जेव्हा एखाद्या वृत्तामुळे तो अडचणीत येतो तेव्हा वृत्तपत्रांच्या वरिष्ठांनी त्याला सहकार्य करावे फक्त एवढीच माफक अपेक्षा त्याला असते. मात्र अश्या वेळी वरिष्ठ हात झटकून मोकळे होतात, ही बाब वार्ताहरांसाठी दुर्दैवी आहे. राम पवार यांनी केलेले वृत्तांकन हे सामाजिक भान ठेवून केलेले वृत्तांकन आहे. त्यामुळे आर्णी प्रेस क्लब व इतर पत्रकार संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत. आर्णी प्रेस क्लबच्या सदस्यांनी राम पवार यांचे एकमताने समर्थन केले आहे.

Copyright ©