महाराष्ट्र सामाजिक

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

वर्धा जिल्हा प्रतिनिधी : पंकज तडस 

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्यावतीने (आत्मा) वर्धा येथील द रुरल मॉल मध्ये आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते आज झाले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ.नलिनी भोयर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रभाकर शिवणकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रानभाजी महोत्सवात एकूण 17 शेतकरी उत्पादक गट, महिला बचत गट यांनी सहभाग नोंदवला. मानवी आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या आणि सध्या लुप्त पावत चाललेल्या रानभाज्या या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. तसेच नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. महिला गटाच्यावतीने अंबाडीची भाकर, अंबाडीच्या चटणीसोबत भाजीचे खाद्य स्टॉल सुद्धा लावण्यात आले होते.

रानभाजीमध्ये भुई आवळा, लाल माठ, अंबाडी, शेवगा, लोणचे, कर्टुले, करवंद, कुंजरु, घोळ, चुका, लाल भाजी, सुरण, आघाडा, शेवगा, कांचन, पाईन, साबुदाणा, करवंद, तरोटा, राजगिरा, अंबाडी अळू, खापरखुंटी, केना, मायाळू, धोपा इत्यादी भाज्या ठेवण्यात आल्या होत्या. रानभाजी महोत्सवास वर्धा शहरातील ग्राहकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

महोत्सवात विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिलेले रानभाजी व खाद्य स्टॉलला भेट देऊन खरेदी केली. विविध प्रकारच्या रानभाज्या पाहून ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. या भाज्या आरोग्यासाठी लाभदायक असून या भाज्या नियमितपणे उपलब्ध झाल्यास बरे होईल, अशी भावना अनेक ग्राहकांनी व्यक्त केली.

Copyright ©