Breaking News यवतमाळ सामाजिक

अन् त्या जुळ्या बहिणींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर

 

( ‘ हे बंध महागावचे ‘ व्हॉट्स ऍप समूहातून मदत )

महागाव कसबा –
आर्थिक विवंचनेमुळे पदवीचे शिक्षण घेण्यास अडसर निर्माण झालेल्या जुळ्या बहिणींची व्यथा सोशल मीडियावरील ‘ हे बंध महागावचे ‘ या समूहावर व्हायरल होताच संवेदनशील महागावकर मदतीसाठी सरसावली असून त्या बहिणींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला.
महागाव कसबा येथील रस्त्याच्या कडेला एका चंद्रमौळी झोपडीत लोहार समाजातील सोनू व मोनु या जुळ्या बहिणी आई सोबत वास्तव्यास आहे. घरात अठरा विश्व दारिद्रय. रोजमजुरी करून उदर निर्वाह करतात. गावातच त्या जुळ्या बहिणींचे कला शाखेतून बारावी पर्यंत शिक्षण झाले. आर्थिक अडचणी मुळे पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान मुलींच्या आईने पत्रकार दीपक वगारे यांचे जवळ व्यथा कथन केली. यासंदर्भात त्यांनी अत्यंत पोटतिडकीने मित्रांसोबत त्या मुलींच्या शिक्षणासाठी काही करता येईल काय, या बाबत चर्चा केली. आणि दिनांक ०९ ऑगस्ट रोजी ‘ हे बंध महागावचे ‘ या व्हॉट्स ऍप समूहावर सुनील आरेकर यांनी एका पोस्ट मधून त्या जुळ्या बहिणींच्या शैक्षिणक मदती करिता आवाहन केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्या समूहावर गावच्या मातीशी नाळ जुळलेली अनेक संवेदनशील मने जुळ्या बहिणींच्या शैक्षिणक मदती साठी सरसावली. सेवानिवृत्त शिक्षक बबनराव मुंडवाईक यांनी त्या मुलींना प्रत्यक्ष भेटून व्यथा जाणून घेत आर्थिक मदत केली. बी. ए.(प्रशासकीय) प्रथम वर्षाला प्रवेश निश्चित झाला. दरम्यान अभियंता मधुसूदन ताजने , विक्रीकर अधिकारी विजय दुधे , शिक्षक गिरीश दुधे , कटाक्ष न्यूज पोर्टलचे संपादक मनोज ताजने , भूमी अभिलेख राजेश पांडे यांनी फोन पे द्वारा आवश्यक आर्थिक मदत पाठविली. तसेच साई सेवा ग्रुपचे ज्ञानेश्वर आरेकर यांचे कडून शालेय गणवेश , पुंडलीकराव चतुर, हरिभाऊ परांडे ,निलेश चव्हाण यांचे देखील यामध्ये योगदान लाभले.विशेष म्हणजे गोविंदराव दुधे महाविद्यालय, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकराव चिरडे व सचिव धर्मेंद्र दुधे यांनी शैक्षिणक सवलती संदर्भात तांत्रिक बाबी सांभाळत परीक्षा फी व पुस्तकांसह भरीव मदत करण्याचा संकल्प केला. सदर चळवळीतून मुलींच्या शिक्षणासाठी गोळा झालेली आर्थिक तथा आवश्यक वस्तू स्वरूपातील मदत महागावचे सरपंच किशोर बीहाडे, तंटा मुक्त गाव समिती अध्यक्ष संजय जयस्वाल , सामाजिक कार्यकर्ते दीपक लाड यांचे उपस्थितीत जुळ्या बहिणींना सुपूर्द करण्यात आली. त्या जुळ्या बहिणींच्या स्वप्नांना बळ मिळाले. भविष्यात लोहार समाजातील त्या कुटुंबाला शासनस्तरावर न्याय मिळावा, अशी अपेक्षा देखील व्यक्त होत आहे.

Copyright ©