यवतमाळ सामाजिक

शासकीय योजनांची गुणवत्तापुर्वक अंमलबजावणी करा- डॅा.पंकज आशिया

शासकीय योजनांची गुणवत्तापुर्वक अंमलबजावणी करा- डॅा.पंकज आशिया

जिल्हा विकास आराखडा तयार करण्याबाबत बैठक

यवतमाळ, दि. 2 : केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजना सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्यासोबतच त्यांचे उत्पन्न कसे वाढविता येईल, या अनुषंगाने राबविल्या गेल्या पाहिजे. जिल्हा विकास आराखडा तयार करतांना विभागांनी या बाबींचा विचार करून प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिले.

नियोजन सभागृहात जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षक डॅा.पवन बनसोड, उपवनसंरक्षक श्री.जगताप, धनंजय वायभासे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे वरिष्ठ प्राध्यापक ज्ञानदेव तळुले, प्रा.सुभाष कोंबडे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर आदी उपस्थित होते.

शासन विविध प्रकारच्या योजना राबविते. अनेक योजना आपल्याला उद्दिष्ट असल्यामुळे राबविल्या जातात. परंतू योजना राबवितांना लाभार्थ्यांना खऱ्या अर्थाने फायदा होतो का? तेही पाहिल्या गेले पाहिजे. योजनेतून लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासोबतच त्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे. विविध योजनांचा समन्वय साधून जिल्ह्याचा विकास कसा साधू शकू, याकडे विभागांनी लक्ष द्यावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करतांना तो अधिक चांगला कसा होईल, याकडे लक्ष द्यावे. आराखडा सर्वसमावेशक झाला पाहिजे. प्रत्येक क्षेत्राचे प्रतिबिंब आराखड्यात असावे. शेती, पशुपालन, उद्योग, दुग्धोत्पादन, सहकार, लघुउद्योग अशा रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देणाऱ्या बाबींचा प्राधान्याने आराखड्यात समावेश असावा. विभागांनी आराखड्यासाठी बाबी सुचवितांना सर्वांगीण विचार करून सुचवाव्यात.

केंद्र शासनाच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक चांगल्या योजना आहे. या योजना अधिक चांगल्या पध्दतीने कशा राबविता येईल, याचाही विचार होणे आवश्यक आहे. कृषि आणि कृषीशी संबंधित क्षेत्रांना प्राधान्य देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. यावेळी काही विभागांनी आराखड्यासाठी सुचविलेल्या बाबींवर जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

जिल्हा विकास आराखड्यासाठी शासनाच्यावतीने तज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आलेले प्रा.ज्ञानदेव तळुले यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. विकास आराखडा अधिक चांगला होण्यासाठी कोणत्या बाबी प्राधान्याने समाविष्ठ केल्या पाहिजे व या बाबींवर कशा प्रकारे काम करावे लागेल याबाबत मार्गदर्शन केले. बैठकीला सर्व विभाग प्रमुख अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती उपस्थित होते

राष्ट्रीय अन्न सुरक्षा, पोषण अभियान कडधान्य कार्यक्रमांतर्गत

अनुदानावर गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संचासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. १ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य कार्यक्रमांतर्गत अनुदानावर गोदाम बांधकाम व बीज प्रक्रिया संचासाठी जिल्ह्यातील इच्छूक शेतकरी उत्पादक संघ अथवा कंपन्यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.

सन २०२३-२४ या वर्षात कृषि विभागामार्फत जिल्ह्यात उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य किंवा गळीतधान्य ही योजना सर्व तालुक्यात राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबीतंर्गत जिल्ह्याकरिता सहा गोदाम बांधकामाचे लक्षांक तसेच बीज प्रक्रिया युनिट एक लक्षांक प्राप्त आहे. गोदाम बांधकामाकरिता इच्छूक शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीचा लाभ घेवू शकतात. परंतु त्या शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपन्यांनी यापूर्वी या बाबीचा कंपनी किंवा संघ किंवा गटाच्या नावे लाभ घेतलेला नसला पाहिजेत. गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२.५० लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. व बीज प्रक्रिया युनिट करिता प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. ही बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छूक शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपन्यांना लाभ घेता येईल. लाभार्थी पात्रता शेतकरी उत्पादक संघ किंवा शेतकरी उत्पादक कंपनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना किंवा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बॅंकेकडे प्रकल्प सादर केल्यानंतर व बॅंकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित कंपनी या बाबीच्या लाभास पात्र राहील.

 

मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित शेतकरी उत्पादक संघ अथवा कंपनी या बाबीच्या लाभास पात्र राहील. लाभ घेणाऱ्या इच्छूक शेतकरी उत्पादक संघ व कंपन्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज सादर करावा. जिल्ह्यास देण्यात आलेल्या लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येईल. सदर गोदाम बांधकामाचा लाभ घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपन्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ यांनी केले आहे.

सफाई कामगाराकरिता सेवा सोसायटींनी

प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 1 : नेरमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने ठरवून दिलेल्या पूर्णवेळ सफाई कामगाराकरिता एक सफाईगार याप्रमाणे कंत्राटी तत्वावर काम वाटप करावयाचे आहे. त्यासाठी नोंदणीकृत सेवा सोसायटींनी प्रस्ताव 3 ऑगस्ट रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयास सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने 3 लाख रुपये इतक्या रकमेची कामे विना निविदा उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभाग शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नेर येथे सफाईगार कामाकरिता सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटप करण्यासंदर्भात प्रस्ताव प्राप्त झालेला आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नेर या संस्थेने ठरवून दिलेल्या पूर्णवेळ सफाई कामगाराकरिता एक सफाईगार या प्रमाणे कंत्राटी तत्वावर काम वाटप करावयाचे आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायटींनी या कार्यालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र अद्ययावत केलेले आहे. अशा संस्थांनी सदरील कामाबाबत प्रस्ताव 3 ऑगस्ट रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत निम्न स्वाक्षरीतांच्या कार्यालयास सादर करावीत. आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता करणे अनिवार्य राहिल. उशिरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरुपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाही, प्रस्तावासोबत संस्थेचे अद्ययावत नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे सन 2022-23 चे ऑडिट रिपोर्ट, मागील तीन महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट, संस्थेतील सर्व सदस्यांची अद्ययावत यादी व सेवायोजन नोंदणी कार्ड ही कागदपत्रे जोडून प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त वि. सा. शितोळे यांनी केले आहे.

Copyright ©