महाराष्ट्र सामाजिक

“पी एम किसान सम्मान निधी शेतकऱ्यांचा आधार” मा. प्रधानमंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना १४ व्या किस्तीचे हस्तांतरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे 

“पी एम किसान सम्मान निधी शेतकऱ्यांचा आधार” मा. प्रधानमंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना १४ व्या किस्तीचे हस्तांतरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये पीएम किसान सन्मान योजना सुरु केली. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये जमा केले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम तीन टप्प्यात पाठवली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १३ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. दि. २७ जुलै, २०२३ रोजी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली व मा. प्रधानमंत्री यांच्या हस्ते ८.५ करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १४ वी किस्त म्हणजेच एकूण रु. १७,५०० करोड इतकी रक्कम हस्तांतरित करण्यात आली. सदर कार्यक्रम सिकर, राजस्थान येथुन वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक गावी तसेच तालूक्याला थेट प्रक्षेपित करण्यात आला. या दरम्यान जिल्हा प्रशासन अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, कृषि विभाग, जिल्हा परिषद व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.सिंधुताई सपकाळ सभागृह येथे थेट प्रक्षेपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षस्थान जिल्हा परिषद चे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रोहन घुगे यांनी भूषविले तसेच लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा. श्री. अविनाश देव व श्री.मिलिंद भेंडे तसेच प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ. नलिनी भोयर प्रमुख उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. प्रभाकर शिवणकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे तसेच आरसीएफ चे श्री. सुयोग देशमुख यांच्या निदर्शनाखाली करण्यात आला.पीएम किसान योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. जर ई-केवायसी केली नसेल तर शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून ई-केवायची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. याशिवाय सीएससी केंद्रावर जाऊन देखील शेतकरी ही प्रक्रिया करु शकतात. अशी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.वर्धा जिल्ह्यातील तालुकास्तरावर कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा व कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसमवेत कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले.

Copyright ©