यवतमाळ सामाजिक

भरपावसात तहसीलदारांनी पुसले पुरबाधितांचे अश्रू

भरपावसात तहसीलदारांनी पुसले पुरबाधितांचे अश्रू

तहसीलदारांचे मदतीचे आश्वासन : अन्यथा बाधीत उतरणार होते रस्त्यावर

यावर्षी महाभयंकर ऐतिहासिक पावसाने सर्व विक्रम मोडित काढले. अन्‌ क्षणात होत्याचे नव्‍हते झालं. या पुरात सर्वसामान्यांसह, व्‍यापारी, शेतकरी, अनेक कुटुंब पुर्णत: उद्ध्वस्थ झाले आहे. अशातच गुरुवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने पुन्हा यवतमाळवाशीयांना झोडपून काढले. शहरातील एका भागातील पुरग्रस्तांनी मदतीसाठी शुक्रवारी (ता.२७) रोजी सकाळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे नियोजन केले होते. एैनवेळी समाजसेवकासह, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी भरपावसात हजेरी लावत पुरग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या. व त्यांचे अश्रू पुसले. होणारा उद्रेक वेळीच थांबला.

शहरातील धामणगाव रोडवरील राजरतन नगर भागात ४० ते ५० घरांची वस्ती आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात धो-धो पाऊस सुरू आहे. रस्त्यावरील नाल्या चोकअप असल्याने पुर्णत: गटारगंगा ठिकठिकाणी वाहत गेली. यात राजरतन नगर भागातील २० ते ३० घरात पाणी घुसल्याने नागरिकांपुढे उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे राहिले होते. या भागाकडे प्रशासनासह अन्य लोकप्रतिनिधींचे लक्ष नव्‍हते. त्यामुळे पुरग्रस्तांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या रोषाचा बांध फुटून शुक्रवारी एल्गार करण्याचा निश्चय झाला असतांना सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक उद्धवराव साबळे, नारी रक्षा समितीचे सल्लागार विजयकुमार बुंदेला, नारी रक्षा समितीच्या सौ. पुनम अलोणे, सौ. कल्पना माळगण, सय्यद मतीन पत्रकार यांनी या पुरग्रस्त भागाला भेट दिली. येथील समस्यांचे गांभीर्य लक्ष घेवून तहसीलदारांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. क्षणाचाही विलंब न करता तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी भरपावसात भेट देवून येथील नुकसानग्रस्त २० ते ३० घरांची पाहणी केली. तत्परतेने धान्य किट उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या व शासनातर्फे जे काही मदत शक्य असल्यास ती पुर्ण देऊ असे आश्वासन पूरग्रस्तांना दिले.

अधिकाऱ्याने जपली माणूसकी

अधिकारी म्हटला की, शासकीय काम अन्‌ इतर कर्मचाऱ्यांवर रुबाब टाकण्याचा असा प्रकार नित्याचाच झाला आहे. अधिकाऱ्याने माणूसकी जपण्याचे उदाहरण क्वचितच आढळतात. गेल्या तीन दिवसांपासून प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. अशात काल रात्रीपासून पावसाने पुन्हा धो-धो हजेरी लावली. प्रशासकीय यंत्रणा सर्वत्र हतबल झालेली असताना अधिकाऱ्याने पुरग्रस्तांची अश्रू पुसत त्यांच्या समस्यांसाठी पुढाकार घेवून मदत करणे. हे ही एक माणूसकी जिवंत असल्याचे उदाहरण आहे. त्यांनी इतर अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. यामुळे त्यांच्या अधिकारी पेशातील माणूसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आला.

Copyright ©