महाराष्ट्र सामाजिक

एकात्मिक शेती पद्धती सर्वोत्तम डॉ. जीवन कतोरे

देवळी ता. प्रतिनिधी:सागर झोरे

एकात्मिक शेती पद्धती सर्वोत्तम डॉ. जीवन कतोरे

खापरी (मुंगापूर) येथे शेतकरी शास्त्रज्ञ मंच सभेचे आयोजन

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे याकरिता एकात्मिक शेती पद्धतीचा वापर याबद्दल विविध तंत्रज्ञानाची माहिती कृषी विज्ञान केंद्र द्वारे सतत दिली जाते,या तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे प्रगतिशील शेतकरी इतर शेतकरी बांधवांसाठी आदर्श ठरतात. शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन शेती पद्धतीचा अवलंब करावा या अनुषंगाने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मा.कुलगुरू डॉ.शरद गडाख यांच्या संकल्पनेतून व मा. संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. डी. बी.उंदिरवाडे यांच्या मार्गदर्शनातून सुरू झालेल्या शेतकरी शास्त्रज्ञ मांचाला जिल्ह्यातील शेतकरी उत्तम प्रतिसाद देत आहेत.या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा अंतर्गत स्थपित शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची जुलै महिन्यातील सभा सेलू तालुक्यातील दत्तक गाव खापरी(मुंगापूर) येथील श्री.पुरुषोत्तम वैद्य यांच्या शेतावर आयोजित करण्यात आली.या दरम्यान सदर शेतकऱ्याच्या शेतावर भाजीपाला, कपाशी,तूर,फळझाडे, कुक्कुटपालन,शेळीपालन,कंपोस्ट निर्मिती आशा एकात्मिक शेती पद्धतीला शास्त्रज्ञ- शेतकऱ्यानं समवेत भेट देण्यात आली.शेती पद्धतीमध्ये शेतीशी निगडित विविध व्यवसाय व पिक पद्धती यांची योग्य सांगड घालून उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा वापर दुसऱ्या व्यवसायासाठी करून खर्च कमी करता येतो,या पद्धतीची एकात्मिक शेती केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढेल असे मार्गदर्शन वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.जीवन कतोरे यांनी केले.सध्याच्या परिस्थितीत शेतीला लागणारे यंत्र किंवा बाजारपेठ यांसारख्या समस्या एकटा शेतकरी सोडवू शकत नाही याकरिता गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गटाने शेती केल्यास सर्वांना फायदा होऊल असे कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.पी.जंगवाड यांनी सांगितले.शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष श्री.दिलीप पोहणे यांनी कपाशी पिकातील अतिसघन लागवडीतून मिळालेल्या यशाबद्दल सर्व शेतकऱ्यांना अनुभव कथन केला व सर्वानी त्यांचे एक आदर्श शेतकरी म्हणून कौतुक केले.

सभेदरम्यान शेत-शिवार फिरत असताना शेतीच्या वार्षिक व्यवस्थापनाबद्दल माहिती देत वर्षभर शेतीमधून उत्पन्न कसे घेता येईल याकडे कल असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती शेतीमध्ये काम करतात असे श्री.पुरुषोत्तम वैद्य यांनी सांगितले. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमित्ताने शेतकऱ्यांना नवीन वाटणारे तृणधान्य या विषयी गृहविज्ञान विषयतज्ञ डॉ.प्रेरणा धुमाळ यांनी माहिती दिली तसेच ज्वारी, बाजरी, राळा,राजगिरा या पिकांचे बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्रातील कृषिविद्या विषयतज्ञ डॉ.रुपेश झाडोदे व पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषयतज्ञ डॉ. सचिन मुळे यांनी शेती निगडित बाबींवर शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ.अंकिता अंगाईतकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उपसरपंच श्री. सुरेश गव्हाळे,सौ.धनवंतरी गव्हाळे व गावातील शेतकरी यांनी योगदान दिले.

 

Copyright ©