Breaking News यवतमाळ

संततधार पावसामुळे पाथ्रड देवी येथील गोकी प्रकल्प ओव्हरफ्लो, 

चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी

संततधार पावसामुळे पाथ्रड देवी येथील गोकी प्रकल्प ओव्हरफ्लो, 

सावळा गावामध्ये अनेकांच्या घरात शिरले पाणी; पिकांचेही मोठे नुकसान

दारव्हा. तालुक्यात गत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत असून या पावसाचा जोरदार फटका तालुक्यातील अनेक गावांना बसला. अनेक गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दारव्हा शहरातील काही नदीकाठचा परिसर अक्षरशः पाण्याखाली गेला. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतांमधील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. नदी, नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून लगत असलेली शेती खरडून गेली आहेत.

 

हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला होता. त्या अनुषंगाने काल दिवसभर पाऊस कोसळत होता. मात्र मध्यरात्रीपासून पावसाने रौद्ररूप धारण केले. त्याची परिणीती म्हणून नदी- नाल्यांना जबरदस्त पूर आला. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पाथ्रड देवी येथील गोकी प्रकल्प ओव्हरफ्लो, झाल्याने सावळा हे गाव पाण्याखाली असून नदीकाठचे परिसर प्रभावित झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरून घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. परिसराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून पुराच्या पाण्यात साप, विंचू वाहून आल्यामुळे ही वेगळीच समस्या निर्माण झाली असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

 

तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दूबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. पावसाने दडी मारल्याने आधीच पेरणीला उशीर झाला. त्यात आणखी शेतकऱ्यांवर संकट उभे ठाकले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शेतक-यांचे शेतीचे बांध फुटून पानी थेट शेतात घुसल्याने पिके वाहून गेली असल्याचे कळते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता पुन्हा केंव्हा शेतीची दुरुस्ती करणार आणि नंतर केंव्हा दुबार पेरणी करणार, अशी परिस्थिति शेतकऱ्यांची झाली आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्यामुळे शासनाने तालुका अतिवृष्टी घोषित करून तातडीने सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Copyright ©