यवतमाळ सामाजिक

तरोडा येथे” जिव्हाळा -१९७७ ” तब्बल ४६ वर्षांनंतर वर्गमित्रांची स्नेह भेट

तरोडा येथे” जिव्हाळा -१९७७ ” तब्बल ४६ वर्षांनंतर वर्गमित्रांची स्नेह भेट

तरोडा येथे” जिव्हाळा -१९७७ ” चां आनंदाला उधाण..

यवतमाळ :- ‘भारतीय संस्कृती’ ही शाश्वत मूल्ये जोपासणारी पारंपरिक संस्था आहे. विशेष म्हणजे ‘संस्कार’ या केंद्रीभूत मूल्यांच्या सभोवताली वावरणारा हा माणूस आहे. नातेसंबंध हा सांस्कारिक वारसा आहे. रक्तांच्या नात्यापेक्षाही अनोळखी भावानुबंध शाश्वत मूल्यांची जपणूक करतात. हाच धागा पकडून ” जिव्हाळा – १९७७ ” या वर्गमित्रांचा स्नेह भेट सोहळा पार पडला. देशी पूर्व माध्यमिक, शाळा, तरोडा, ता. आर्णी , जि. यवतमाळ हे पूर्वाश्रमीचे नांव असून आज जि. प. उच्च प्राथमिक शाळा असे आहे. १९७५- ७७ या कालखंडात पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या तत्कालीन विद्यार्थ्यांनी आणि आजच्या जबाबदार नागरिकांनी माजी विद्यार्थ्यांच्या ” जिव्हाळा – १९७७” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. असा सोहळा आजतागायत झाला नसेल. अभूतपूर्व आनंदाचा क्षण अनुभूतीस आला. वयाच्या साठीकडे झुकलेले वर्गमित्र- मैत्रीणी एकत्र आले तेव्हा एकमेकांना ओळखतसुद्धा नव्हते. चेहरे बदलत असतात . इतक्या वर्षांनंतर येणाऱ्या असल्या क्षणाला कोणीही आयुष्यभर विसरू शकणार नाही, असा आनंद मेळावा प्रस्तुत प्रसंगी होता. माता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला सर्वांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शाळेच्या चिमुकल्यांनी सुश्राव्य स्वागत गीताचे सादरीकरण केले.प्रास्ताविक संतोष घ्यार यांनी केले. सर्व प्रथम सर्व स्वर्गीय गुरुजी व स्वर्गीय वर्गमित्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

८३ वर्षीय गुरुवर्य हरिदास भगत सर हे एकमेव हयात असलेले गुरुजी प्रसंगी उपस्थित होते , माजी विद्यार्थ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. गुरुजींच्या मुखातून शब्द निघत नव्हते. इतका अपूर्व आनंद गुरुजींना झाला होता.शाळेचे मुख्याध्यापक नागोराव कोंपलवार , संतोष घ्यार , आसाराम चव्हाण , राजेंद्र पाटील , कु. गोविंदवार, कु. ज्योती राठोड या सर्व सहायक शिक्षकांनी अप्रतिम सहकार्य केले.

माजी विद्यार्थ्यांमध्ये भाऊराव गावंडे, प्रमोद कोटेचा, ज्ञानेश्वर लाखकर, सुरेश महल्ले, राजुभाऊ कुबडे, शेवंताताई चिक्राम आत्राम, विद्याताई चोपडे डहाके, रेखाताई महल्ले काकडे, प्राचार्य प्रकाश मोरे, बाळाभाऊ वाघमारे ,राजाभाऊ निंबाळकर, किसन चौधरी, सुभाष अवझाडे, रामेश्वर गावंडे, डॉ अनंतकुमार सूर्यकार या सर्वांनी शाळेबद्दल शब्दांमधून आदरभाव व कृतज्ञता व्यक्त केली.

उपसरपंच राहूल महल्ले पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश महल्ले पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रावण डवले प्रसंगी उपस्थित होते.

शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहिलेल्या या सोहळ्यानिमित्त असे म्हटले की, आमच्यासारखेच तुम्हीही इथेच शिकायला होते का ? त्यांच्या आजोबांसमान दिसणा-या माजी विद्यार्थ्यांबद्दल शंका आणि अचंबा वाटणे साहजिक आहे. अप्रतिम सूत्रसंचालन आसाराम सर यांनी तर डॉ अनंतकुमार सूर्यकार यांनी सर्वांचे आभार मानून , भावनिक गीताद्वारे अश्रूंना वाट मोकळी करून दिली.भाऊराव गावंडे यांचे घरी चविष्ट भोजन करून सर्व मित्रांनी निरोप घेतला व घराची वाट धरली.

Copyright ©