यवतमाळ सामाजिक

घाटंजी येथील निराश्रीत वृद्धांना बांधून दिले घर

घाटंजी येथील निराश्रीत वृद्धांना बांधून दिले घर

अन्न वस्त्र निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे. जगण्या साठी अन्न चार घर मागून कुठेही मिळेल मात्र राहायला घर कोण देणार. आजही बरेच व्यक्ती रस्त्यावर झोपतात. निराधार लोक बस स्टॉप, दुकानाचा आडोसा, गल्लीबोळात कुठेतरी आसरा घेऊन आपले वास्तव्य करतात. तर काही लोक पडक्या झोपडी मधे वास्तव्य करतात. ही झोपडी कधी त्यांच्या अंगावर पडेल आणि त्यांचा जीव जाईल सांगता येत नाही. अशा लोकांना हवे आहे हक्काचे घर मात्र या गरीब आणि वृद्धांना कोण देणार घर हा प्रश्नच आहे.

आम्ही घाटंजी येथील सुनंदा सोनवणे आणि वच्छला पेटेवार यांना घर बांधून दिले.

सुनंदा शरीराने व्यंग असलेली अपंग विधवा. सहा वर्षाआधी पतीने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यावेळेस मुलगा छोटा होता. कष्ट करून जगण्याची शक्ती तिच्यात नव्हती. सुनंदा एकटी पडली कुठल्याही नातेवाईकांनी तिला आधार दिला नाही. स्वतःच राहत कच्च घर पडलं मात्र बांधण्यासाठी तिच्याकडे पैसेही नव्हते. म्हणून ती स्वतःच घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाऊन निराश्रित म्हणून राहू लागली. एकदा महेश पवार यांच्या निराधार संघटनेच्या मिटींगला आली आणि राहायला घर नसल्याची व्यथा महेश पवार यांच्या समोर मांडली. तिच्या डोळ्यातील आसवांच्या धारा सांगत होत्या तिला घराची किती गरज आहे. क्षणाचाही विलंब न करता रसिकाश्रयची टीम कामाला लागली आणि तिचे घर उभे करून दिले. आज दोघे मायलेक आनंदाने त्या घरात वास्तव्य करत आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्ही आनंदी झालो.

तसेच वच्छला पेटेवार वय वर्षे ७६ पडक्या झोपडीत राहत होती. मुलगा आहे पण मुलगा पोसत नाही. नातवां सोबत राहून म्हातारपणीचा आनंद घेणे तिच्या नशिबी नाही. म्हणून अतिक्रमणच्या जागेवर एक झोपडी बांधून गेल्या दहा वर्षांपासून ती राहत आहे. कुणीतरी जेवायला देत तेव्हा तिच पोट भरत. संपूर्ण थकलेले शरीर शरीरात त्रान नाही. पडकी झोपडी कधी अंगावर पडेल आणि तिचा जीव जाईल याचा नेम नाही. तिचे ही घर उभे झाले.

दोन्ही घर उभे झाले आणि थाटामाटात उद्घाटन सोहळा पार पडला. घाटंजी चे प्रतिष्ठित नागरीक भरत तायडे, विठ्ठल बिजेवार यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. घराचे पूजन करून वच्‍छलाबाई आणि सुनंदा यांना पेढा भरवण्यात आला.

महेश पवार, लोकसेवक घाटंजी

Copyright ©