महाराष्ट्र सामाजिक

येवद्यात आशिष कृषी केंद्र समोर शेतकऱ्यांचे आंदोलन

येवद्यात आशिष कृषी केंद्र समोर शेतकऱ्यांचे आंदोलन

– सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के आक्रमक

– बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्या जात असल्याचा आरोप

दर्यापूर : तालुक्यातील येवदा येथील ज्ञानेश्वर कळमकर यांच्या आशिष कृषी केंद्र समोर शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा निषेध नोंदविता आज जोरदार निषेध आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. सकाळपासून रांगेत लागून सुद्धा बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी मैदानात येत आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित कृषी केंद्र व कृषी विभागाचे साठे-लोटे असल्याने परिसरात बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण केल्या जात असल्याचा आरोप केला आहे.

तालुक्यातील येवदा येथे गांधी चौकात ज्ञानेश्वर कळमकर यांचे आशिष कृषी सेवा केंद्र आहे. या केंद्रावर परिसरातील शेतकऱ्यांनी सकाळपासून बियाणे खरेदी करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. दरम्यान त्यांना बियाणे देताना दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप आहे. संबंधित रांगेत लागलेल्या शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी आक्रमक होत संबंधित कृषी केंद्रात असलेल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. शेकडो शेतकरी कृषी केंद्रावर धडकत असल्याने परिसरात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी आक्रमक होत कृषी विभागाला धारेवर धरले. शेकडो शेतकऱ्यांसह हातात पोस्टर घेत कृषी विभागाचा निषेधही त्यांनी नोंदवला. या निषेध आंदोलनात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

—–

अन्यथा कृषी केंद्र पेटवून टाकू – सोनटक्के

दर्यापूर तालुक्यातील येवदा भागात कृषी विभाग व कृषी केंद्र संचालकांकडून मिली भगत करत बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्या जात आहे. बियाण्यांची मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये साठेबाजी केली जात आहे. काही कृषी केंद्र संचालकांकडून चढ्यादरात बियाणे दिली जात आहेत तर सामान्य शेतकऱ्यांना त्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी केला आहे. कृषी विभागाने धाडी टाकून या प्रकाराला तत्काळ पाय बंद घालावा. नाही तर साठेबाजी करणाऱ्या कृषी केंद्रांच्या गोडाऊनवर आपण धडक देऊन थेट गोडाऊन पेटवून देऊ असे वादग्रस्त वक्तव्य सोनटक्के यांनी केले आहे.

जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार

येवदा येथील या गंभीर प्रकारासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांच्या नेतृत्वात परिसरातील सुमारे 40 शेतकऱ्यांनी लेखी तक्रार जिल्हा कृषी अधीक्षकांकडे केली आहे. या तक्रारीवर कृषी विभाग काय कारवाई करते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच खासदार डॉ.अनिल बोंडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडेही ही तक्रार पाठवण्यात आल्याचे सोनटक्के यांनी सांगितले आहे.

Copyright ©