महाराष्ट्र सामाजिक

वर्धा शहरानजीक दोन ठिकाणी धाडी, 375 ब्रास वाळूसाठा जप्त

वर्धा जिल्हा प्रतिनिधी  पंकज तडस

वर्धा शहरानजीक दोन ठिकाणी धाडी, 375 ब्रास वाळूसाठा जप्त

महसूल प्रशासनाची सलग दुसऱ्या दिवशी कारवाई

जप्त साठा घरकुल लाभार्थ्यांना विनामुल्य देणार

कारवाईत एसडीओ, तहसिलदाराचा सहभाग

वर्धा शहरानजीक दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैधपणे साठवलेल्या वाळू साठ्यावर धाड टाकून 375 ब्रास साठा जप्त करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या पथकाने ही कारवाई केली. सर्व साठा जप्त करण्यात आला आहे. अवैध वाळूसाठ्यावर सलग दुसऱ्या दिवशी महसूल प्रशासनाने ही मोठी कारवाई केली.

शहरानजीक नागठाना व दत्तपूर येथील एका लेआऊटच्या ओपन स्पेसमध्ये अवैधपणे वाळूचा साठा करण्यात आला असल्याची माहिती महसूल प्रशासनास आज दुपारी प्राप्त झाली होती. माहिती प्राप्त होताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या पथकाने धाडीची कारवाई केली.

नागठाना परिसरात घातलेल्या धाडीत 300 ब्रास वाळूसाठा आढळून आला. हा सर्व साठा जप्त करण्यात आला. नागठाना येथील कारवाई नंतर पथकाने दत्तपूर येथील एका लेआऊटमधील अवैधपणे वाळूसाठा असलेले ठिकाण गाठले. या ठिकाणी 75 ब्रास वाळूसाठा आढळून आला.

ही कारवाई जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या पथकाने केली. यावेळी त्यांच्यासमवेत वर्धाचे उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसिलदार रमेश कोळपे, नायब तहसिलदार अजय धर्माधिकारी व संबंधित कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.

कारवाई जप्त करण्यात आलेला हा साठा वर्धा तहसिलदार रमेश कोळपे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. वाळूचा साठा करणाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शासनाच्या नव्या धोरणाप्रमाणे नोंदणी करुन लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करुन दिली जात आहे. जप्त करण्यात आलेला हा वाळू साठा नोंदणी केलेल्या व प्रतिक्षा यादीत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Copyright ©