Breaking News यवतमाळ

वीज पडल्याने एकाचा मृत्यू तर एक जखमी

वीज पडल्याने एकाचा मृत्यू तर एक जखमी

वादळ वाऱ्यासह विजेचा कहर ; अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली

दिग्रस शहरासह तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये आज दि.४ जून रोजी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटात दिग्रस गुरुदेवनगरातील एका दुमजली इमारतीवरून बांधकामाचे साहित्य आणण्यासाठी गेलेल्या मिस्त्री व मजुराच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये मिस्त्री दुमजली इमारतीवरून जमिनीवर कोसळून मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेला एक मजूर बेशुद्ध पडल्याने त्याच्यावर दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 

शहरात दि.४ जून रोजी दुपारी २ नंतर अचानक आभाळ दाटून आले व जोरदार वादळी वारा व पावसाला सुरुवात झाली. शहरातील गुरुदेव नगर भागातील रामराव नथ्थु रुडे यांच्या घराचे दुसऱ्या माजल्याचे बांधकाम करण्याचे मिस्त्रीचे साहित्य होते. रविवार असल्याने बांधकाम बंद होते. तेव्हा साहित्य आणण्यासाठी गेलेल्या मिस्त्री व मजूर यांच्यावर वीज पडल्याने मिस्त्री शेख असिफ शेख कादर (वय-३२) रा.देऊरवाडी हा जमिनीवर कोसळला तर मजूर शेख सलीम शेख हमजा (वय-३०) रा. देऊरवाडी पुनर्वसन हा बेशुद्ध झाला. या दोघांला उपचारासाठी दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता मिस्त्री शेख असिफ शेख कादर याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या छाती पोट्यावर जळालेले दिसून आले. तर जखमी मजूर शेख सलीम शेख हमजा हा गंभीर जखमी झाला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पंचनामा तलाठी यांनी केला.

 

या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली तर अनेक ठिकाणी मोठी मोठी झाडे उन्मळून पडली. शहरातील तहसील कार्यालय परिसरातील सुनिल हिरास यांच्या घरावर कडुलिंबाचे झाड उन्मळून पडले तसेच निंभा येथील अजय सुभाष लोखंडे यांचे घरावरील टिन उडून टिनावरील दगड पायावर पडल्याने ते गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्याने दिग्रस शहराचा विद्युत पुरवठा खंडित होता.

Copyright ©