यवतमाळ सामाजिक

बुद्ध हा पूजेचा नव्हे, तर पुनर्रचनेचा विषय! डॉ. अशोक पळवेकर

बुद्ध हा पूजेचा नव्हे, तर पुनर्रचनेचा विषय! डॉ. अशोक पळवेकर

बुद्धाचा धर्म मीमांसेचा प्रारंभ हा ‘दुःख’ मीमांसेपासून होत असून या दुःख मीमांसेचे सूत्र डॉ. आंबेडकरांनी सामाजिकतेशी जोडले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने बुद्ध विचार स्वीकारायचा असेल तर बुद्ध हा केवळ पूजाअर्चेचा विषय नसून तो सामाजिक पुनर्रचनेचा विषय आहे, असे स्पष्ट प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरवादी विचारवंत व कवी, प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर यांनी केले. यवतमाळ येथील झुलेलाल प्राइड हॉटेलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या माजी शिक्षणाधिकारी व्ही.पी. पाटील यांच्या ‘बुद्धाची उजेळवाट’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. पळवेकर यांच्या हस्ते पार पाडल्यानंतर ते या प्रकाशन समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. पळवेकर असे म्हणाले की 1935 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर तब्बल 21 वर्षांनी 24 ऑक्टोबर 1956 साली बुद्ध धम्माचा स्वीकार केला. हा धम्म स्वीकार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरात पसरलेल्या बुद्ध वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास करून त्यातील परंपरागत बुद्ध नाकारत त्यांनी संशोधित केलेला मूळ बुद्ध स्वीकारला. या मूळ बुद्ध विचारांची मांडणी त्यांनी त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात करून ठेवली होती. परंतु धर्मांतरांच्या घटनेपूर्वी हा ग्रंथ प्रकाशित न होऊ शकल्याने डॉ. बाबासाहेबांचा बुद्ध लोकांसमोर येऊ शकला नाही. डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर 1957 साली या ग्रंथाची पहिली इंग्रजी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानंतर 1970 साली मराठी आवृत्ती आली, त्यामुळे डॉ. बाबासाहेबांनी संशोधित केलेल्या बुद्धाची मांडणी लोकांसमोर येण्यासाठी बराच अवधी गेला. 1956 सालच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराने भारतात एक सुपीक भूमी तयार झालेली होती. या गोष्टीचा फायदा घेत जगभऱ्यातील बौद्ध धर्मीयांनी त्याचा प्रचलित बुद्ध धर्म भारतीय भूमीत पुन्हा लोकांसमोर आणला आणि त्याचाच प्रसार व प्रचार केला. परिणामी हा धर्मांतरित बौद्ध समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धा पासून कोसो दूर राहिला, आणि एक विपरीत वास्तव्य या समाजात कायम प्रस्थापित होत गेले. धार्मिक आचार म्हणून केवळ पूजाअर्चा आणि कर्मकांड यातच हे लोक अडकून पडले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित नव्हते म्हणून त्यांनी जवळपास दोन दशक बुद्धाशी संबंधित जगभरातील परंपरागत बुद्ध चरित्र, कथा, भाकडकथा, दंतकथा, चमत्कार कथा, काव्य कथा या सर्व जंजाळातून बुद्धाचे खरेखुरे चरित्र शोधले. तसेच जगभरातील बौद्ध वाङ्मयात बुद्धाच्या नावाने प्रचलित असलेली वचने, प्रवचने, भाषणे, संभाषणे, बोधकथा, गाथा इत्यादींवरील धर्माचार्याची भाष्य, महाभाष्य, प्रतिभाष्य आचारसंहिता तात्विक व व्यावहारिक प्रश्न आणि त्यावरील चर्चा या संबंधीचे धर्म मंथन करून डॉ. आंबेडकरांनी प्रचंड अभ्यास व मेहनतीने आपल्याला नवा मूळ बुद्ध दिला. ही बाब आपण धर्मांतरानंतरच्या काळात लक्षात घेतली नाही. याचा परिणाम असा झाला की, त्यांच्या या सर्व मेहनतीवर आपण पाणी फिरले असा त्याचा अर्थ होतो. त्यादृष्टीने व्ही.पी. पाटील यांनी लिहिलेल्या ‘बुद्धाची उजेडवाट’ हे पुस्तक आपल्याला मूळ बुद्ध विचाराकडे घेऊन जाणारे आहे. म्हणूनच आपण या पुस्तकाचे स्वागत केले पाहिजे असेही डॉ. पळवेकर यांनी सांगितले. याप्रसंगी विचार मंचावर उपस्थित लेखक व्ही.पी. पाटील यांनी त्यांचे मनोगत मांडले तसेच डॉ. सागर जाधव, बळी खैरे, हेमंतकुमार कांबळे, यांनीही पुस्तकाच्या अनुषंगाने आपले विचार व्यक्त केले. या समारंभाला शहरातील बहुसंख्य लोक उपस्थित होते. यावेळी व्ही.पी. पाटील यांच्या मित्र परिवाराने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. संचालन अंकुश वाकडे यांनी केले.तर आभार डॉ. मेंढे यांनी मानले.

Copyright ©