महाराष्ट्र सामाजिक

सर्वसामान्यांच्या हक्काचे नगर भवन पूर्ववत सुरू करा

देवळी प्रतिनिधी सागर झोरे

सर्वसामान्यांच्या हक्काचे नगर भवन पूर्ववत सुरू करा

युवा संघर्ष मोर्चाची मागणी.

नगर भवनला नशेखोरांचा विळखा.

एकेकाळी देवळी शहरातील सर्वसामान्य गोर-गरीब, शेतकरी-शेतमजुरांच्या पाल्यांच्या लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांकरिता देवळीतील नगर परिषद द्वारा संचालित नगर भवन हे हक्काचे ठिकाण होते. देवळी शहरातील इतर मंगल कार्यालय व हॉलचे भाडे गगनाला भिडले असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अशातच अगदी नाममात्र भाड्यामध्ये नगर भवन उपलब्ध होत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या संपन्न नसलेले कुटुंब मोठ्या प्रमाणात कार्य प्रसंगाकरिता नगर भवनलाच प्राधान्य देत होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या हेतपुरस्पर केलेल्या दुर्लक्षामुळे नगर भवन ची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत पडलेले आहे. मधल्या काळात नगर पालिकेद्वारे नगर भवन कंत्राटी पद्धतीने भाड्याने देण्यात आले होते. त्यातून नगर पालिकेला उत्पन्न मिळत होते. परंतु करार संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्यात आले नाही व नवीन निविदा सुद्धा काढण्यात आल्या नाही आणि त्यामुळे नगर भवनच्या देखभाल व दुरुस्ती अभावी त्यावेळीची देवळीतील सर्व सामान्य नागरिकांच्या हक्काची सर्वात मोठ्या वास्तूची दयनीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या महागाईने सर्व सामान्य नागरिक होरपळत असून लग्नसराईत आर्थिकदृष्ट्या दिलासा देणाऱ्या नगर भवनची आठवण नागरिकांना होत असल्याचे देवळीकरांच्या चर्चेतून दिसत आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळावी व नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडावी या उद्देशाला तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी तिलांजली देण्याचे काम केल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. काही तत्कालीन सत्ताधारी नेत्यांनी लाखोंच्या कमाईसाठी स्वतःचे खाजगी मंगल कार्यालय व लॉन उभारून सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नगर भवन बंद पाडण्याचा घाट रचल्याची चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये सुरू आहे. यातच विद्यमान प्रशासनाची उदासीनता सुद्धा कारणीभूत असल्याचे दिसते. सध्यास्थितीत हे नगर भवन टवाळखोरांचा अड्डा बनल्याचे निदर्शनास येत आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी काळोखात दारू पिणारे,गांजा पिणाऱ्यांची तसेच अश्लील चाळे करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असून सुद्धा पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे सुद्धा देवळीतील या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक युवा संघर्ष मोर्चाने ही बाब जनतेच्या निदर्शनास आणण्याचे काम केले आहे. २० कोटी रुपये खर्च करून नाट्यगृह बांधण्या ऐवजी देवळीकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देऊन देवळीतील नागरिकांना सोयी सुविधा प्रदान करण्याच्या तसेच नगर पालिकेचे उत्पन्न वाढीच्या उद्देशाने तात्काळ नगर भवन पूर्ववत सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांना करण्यात आली. यावेळी युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे, प्रविण कात्रे, गौतम पोपटकर, स्वप्नील मदनकर,मनीष आदमने, प्रविण तराळे,नदीम शेख, मनीष पेटकर,इम्रान शेख, विनय साटूनकर, सागर पाटणकर, बळीराम वैद्य, अमोल राऊत, गौरव खोपाळ, आसिफ शेख, करीम शहा यांच्या सह नागरिकांची उपस्थिती होती.

Copyright ©