Breaking News

*तुती लागवडीत जिल्हा नागपूर विभागात अव्वल*

 

जिल्ह्यात 194 एकरवर तुती लागवड

यावर्षी तुतीसाठी 228 शेतक-यांची नोंदणी

गेल्यावर्षी 25 मेट्रीक टन कोष उत्पादन

वर्धा ( जिल्हा प्रतिनिधी) :- पंकज तडस

रेशीम कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पिक आहे. या पिकाकडे शेतक-यांनी वळले पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान देखील दिले जाते. जिल्ह्यात 194 एकरवर तुतीची लागवड करण्यात आली असून ही लागवड नागपूर विभागात सर्वाधिक आहे. यावर्षी तुतीलागवडीसाठी 228 शेतक-यांनी नोंदणी केली आहे.
पारंपारिक पिकासोबतच शेतक-यांनी इतर पिके सुध्दा घ्यावी. यासाठी गेल्या काही वर्षात सातत्याने प्रयत्न केले जात आहे. रेशीम कोष उत्पादन हा त्या प्रयत्नातीलच एक महत्वाचे पिक आहे. शेतक-यांनी कमी खर्चात अधिक आणि शाश्वत उत्पन्न देणा-या या पिकांकडे वळावे यासाठी मोठ्या प्रमाणावर मनरेगा, नानासाहेब देशमुख कृषि संजीवनी योजना, केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-2 योजनेंतर्गत जमिन तयार करणे, तुती रोपे लागवड, किटक संगोपनगृह बांधकाम, ठिबक सिंचन व पाणी व्यवस्थापन, किटक संगोपन साहित्य यासाठी अनुदान दिले जाते.
जिल्ह्यात काही वर्षात तुतीचे क्षेत्र सातत्याने वाढले आहे. जिल्ह्यात 194 एकरवर तुतीची लागवड झाली आहे. जिल्ह्यात झालेली लागवड विभागात सर्वाधिक आहे. नागपूर जिल्ह्यात 142, भंडारा 49, चंद्रपूर 14, गोंदिया 18 एकरवर तुतीची लागवड झालेली आहे. जिल्ह्यात यापैकी गेल्या केवळ एकाच वर्षात 75 एकरने तुतीचे क्षेत्र वाढले आहे. शेतक-यांना यासाठी प्रोत्साहित करण्याकरीता रेशीम विभागाच्यावतीने अंडीपुंजांचा पुरवठा केला जातो. गेल्या वर्षी 102 एकरसाठी 42 हजार अंडीपुंजांचे वाटप करण्यात आले होते.
कोष उत्पादनातून शेतक-यांना चांगले उत्पन्न मिळते. वर्षभरात सात ते आठ बॅच घेऊन शेतकरी 7 ते 8 क्विंटल कोष उत्पादित करु शकतात. गेल्यावर्षी जिल्ह्यात 25 मेट्रीक टन कोष उत्पादन झाले आहे. हे उत्पादन देखील जिल्ह्यात सर्वाधिक आहे. यावर्षी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रेशीम शेतीकडे शेतक-यांना वळविण्यासाठी स्वत: रेशीम उत्पादक शेतक-यांच्या शेतांना भेटी दिल्या व शेतक-यांना प्रोत्साहित केले.
यावर्षी 277 एकरने तुतीचे क्षेत्र वाढणार
शेतक-यांना तुती लागवडीचे महत्व व फायदे समजावून सांगितल्याने यावर्षी तब्बल 228 शेतक-यांनी तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे. या नोंदणीतुन 277 एकर इतके क्षेत्र नव्याने तुती लागवडीखाली येणार आहे. नोंदणी केलेल्या शेतक-यांमध्ये वर्धा तालुका 41 शेतकरी 53 एकर, सेलू 31 शेतकरी 36 एकर, देवळी 36 शेतकरी 45 एकर,आर्वी 20 शेतकरी 21 एकर, आष्टी 16 शेतकरी 17 एकर, कारंजा 28 शेतकरी 31 एकर, हिंगणघाट 29 शेतकरी 40 एकर, समुद्रपूर 27 शेतकरी 34 एकरच्या नोंदणीचा समावेश आहे.

Copyright ©