यवतमाळ सामाजिक

सामुहिक विवाह मेळावा ही काळाची गरज

 

आज शिक्षणामुळे विविध क्षेत्रात सेवेच्या संधी उपलब्ध झाल्या त्यामुळे अपेक्षीत वधू वर दुरवर विखुरले गेले. आपआपल्या सेवा व्यवसायाशी अनुसरुन जोडीदार मिळवणे ही काळाजी गरज बनली. अशा बदलत्या परिस्थितीत विवाह जुळविण्यासाठी गतिमान व सर्वसमावेशक असा परिस्थितीजन्य उपाय शोधण्याची गरज निर्मान झाली यातुनच वधू-वर परिचय मेळाव्याची कल्पना पुढे आली. व प्रत्यक्षात साकार सुध्दा झाली. आजच्या या कोरोनाचे काळात कमीतकमी पाहुण्यात व कमीत कमी खर्चात आदर्श विवाह पार पाडण्याची शिकवण आपणा सर्वांना मिळाली आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात विवाह जुळवणे जसे जिकीरीचे आहे. तसेच विवाह करणे ही बाब अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण विवाह प्रसंगी होणारा वारेमाप खर्च मानपान वराकडुन लग्न मंडपी होणारी वेगवेगळी मागणी, (आर्थिक व पारंपारीक ) यामुळे मुलीचे वडीलावर येणारा आर्थिक, मानसिक व सामाजीक ताणतणाव यातुन मुलाच्या विवाहाच्या काळजीमुळे अनेक वडील आत्महत्या सारखा दुर्देवी मार्ग स्वीकारतात, तर विवाह होऊ न शकल्याने अनेक प्रौढ कुमारीका समाजात दिसुन येतात. तर मुलीच्या विवाहाची कटकट निर्माणच होवू नये, म्हणून स्त्री भ्रृण हत्या सारखे प्रमाण वाढत असुन समाजातील मुला-मुलीचे असमान प्रमाण झाल्याने अनेक मुलांना पत्नी, आई, बहिण मिळणे आज दुरापास्त झाले आहे.
मुलीचे विवाह प्रसंगी होणारी आर्थिक मागणी किंवा मानापमान यांचे पर्यावसान पुढे कौटुबिंक कलहात होऊन अनेक नववधुचे कौटुबिंक संबंध बिगडून परिस्थिती घटस्फोट, हुडाबळी, आर्थिक, शारीरीक, मानसिक,छळ होतांना समाजात दिसुन येतो. त्याचे विपरीत परीणाम समाजाचे सामाजीक स्वास्थ बिघडण्यात होत, असुन भावी पिढी अथवा बालमनावर त्याचे विपरीत परीणाम होउन, भावी पिढी व्यसनाधीन होणे, गुन्हेगारीचे प्रमाण वाढणे, समाजात त्यांचा मान संन्मान न राहणे, शिक्षणात, सामाजीक व नैतिक प्रगती, समाजातील प्रतिष्ठित स्थान नष्ठ होणे, आर्थिक दुर्बल्य येणे, मानसिक स्वास्थ बिघडणे, भावी पिढीवर योग्य संस्कार न होणे इत्यादी जीवनात कधीही भरुन न निघणारे नुकसान होते.
विवाह प्रसंगी होणारी अतोनात खर्च जो की प्रत्येक वधुच्या वडीलास झेपतो असे नाही, परंतु समाजातील प्रतिष्ठा कायम ठेवण्याकरीता तो आपल्या मुलीचा विवाह थाटामाटात संपन्न व्हावा यासाठी शेती, स्थावर मालमत्ता गहान ठेवणे, प्रसंगी विकणे, अश्या टोकाच्या भुमिकेत सामोरे जावे लागत असल्याने त्याचे आजच्या महागाईच्या जिवनात कधीही भरुन न निघणारे नुकसान समाजाला अधपतनाच्या खाईत ढकलुन देत आहे असे वाटते.
विवाह प्रसंगी होणा-या खर्चाची बचत ही आपल्या भावी पिढिचे शिक्षण, आरेाग्य, सुसंस्कार यासाठी उपयोगात आणल्यास समाज एका प्रगतिच्या वाटेवर चालण्याच्या किरणाची चाहुल प्रत्येकाला लागल्या शिवाय राहणार नाही . यातुन समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य आपल्या हातुन घडल्याचे स्वर्गीय आनंद व समाधान स्वत:स मिळाल्यास प्रत्येकाच्या आयुष्यमानावर व समाजावर त्याचा सकारात्मक परीणाम झाल्या शिवाय राहणार नाही.
महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे वतीने अनुसूचित जमाती, सामाजिक न्याय विभागाचे वतीने अनुसूचित जाती, व्ही. जे. एन. टी., एस. बि. सी. व महिला व बालविकास विभागाकडुन ओ.बि.सी. जनरल मेळाव्यात सहभागी होणा-या जोडप्यास वधुपित्याच्या नावाने रु. १०,०००/- (दहा हजार रु) रुपये धनादेशाचे व रु.२,०००/- रु. आयेाजक संस्थेस प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. यासाठी वधुचे वय १८ वर्ष व वराचे वय २१ वर्ष असावे. वधु पिता हा शेतकरी – शेतमजुर असावा. या साठी वर-वधु यांच पहीलाच विवाह असावा. वधु ही विधवा, घटस्फोटित असल्यास सुध्दा सहभागी होऊ शकते. आदिवासी/समाज कल्याण विभागात किमान १० जोडपे व महिला व बाल विकास विभागाचे मेळाव्यात मेळाव्यात कमीत कमी ५ (पाच) जोडपे असावे, त्यामुळे बाल विवाहास सुद्धा आला बसेल.
या शिवाय जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर रु. ५०,०००/- अनुदान देण्यात येते. अधिक माहितीसाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या २९ वर्षपासून श्री सत्यसाई सर्वधर्मीय विवाह सोहळा सेवाभावी वृत्तीने निशुल्क नोंदणी फी न घेता दरवर्षी १०८ जोडप्याचे विवाह करण्याची परंपरा जिल्हाला लाभली आहे.
वेळ, पैसा, श्रमाची बचत लक्षात घेता सामुहिक विवाह मेळावा ही आज काळाची गरज होऊन बसली आहे.

(गजनन दा. जुमळे)
(प्र.) जिल्हा महिला व बालविकास
अधिकारी यवतमाळ

Copyright ©