यवतमाळ सामाजिक

बालविवाह प्रतिबंधक आणि बालस्नेही गाव या संदर्भात ग्रामसभेत ठराव घ्या

बालविवाह प्रतिबंधक आणि बालस्नेही गाव या संदर्भात ग्रामसभेत ठराव घ्या

बालस्नेही गावासाठी माऊली संस्थेची प्रशासनाला मागणी

घाटंजी:- सध्या रोज वर्तमानपत्रांमध्ये महाराष्ट्रात कुठे तरी बालविवाह झाला किंवा थांबवला, अशा बातम्या येत आहेत. बालविवाह वाढत आहेत. यातून अनेक प्रश्न समोर येतात. हे काम धाडसाचे व महत्त्वाचे आहेच; पण बालकाचे हित जपण्याकरिता आणखी काही करणे अपेक्षित असते. असाच काहीसा प्रयत्न माऊली बहुउद्देशीय संस्था घाटंजी ने घाटंजी तालुक्यातील करमना आणि झरीजामणी तालुक्यातील अर्धवन येथे मागील २०२२ या वर्षी १५ ऑगस्ट मुळे नियोजित असणाऱ्या ग्रामसभेमध्ये

“बालविवाह प्रतिबंधक आणि बालस्नेही गाव निर्माण करण्या बाबतचा ठराव” गावकऱ्यांच्या पुढाकारातून ग्रामसभेत मंजूर करून घेतला आहे. अश्याच प्रकारे संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायती मध्ये असा अभिनव ठराव मंजूर करून बालविवाह आणि कुमारीमाता आणि इतर बालका संदर्भातील प्रश्न निर्माण होवू नये आणि प्रत्येक बालकाला सुरक्षित आणि हसतखेळत बालपण मिळावं याकरिता त्यांनी निवेदन प्रशासनाला सादर केले आहे. त्यांनी प्रशासनाने पुढाकार घेवून असे ठराव मंजूर करून घ्यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.

समस्या निर्माण झाल्यावर काम करण्यापेक्षा ती समस्या निर्माणच होवू नये यासाठी काम करणे महत्वपूर्ण असते. याच बाबीला अनुसरून माऊली बहुउद्देशीय संस्था, घाटंजी ही प्रत्येक बालकाला सुरक्षित आणि हसत खेळत बालपण मिळावं यासाठी बालविवाह, कुमारीमाता हे प्रश्न निर्माणच होवू नये प्रत्येक गाव बालस्नेही व्हावं यासाठी काम करीत आहे. त्यांनी या कामामध्ये गावातील नागरिकांचा आणि खुद्द बालकांचा पुढाकार जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

“गाव करील ते राव काय करील” अशी म्हण प्रचलित आहे. त्यामुळे कुठली समस्या/ प्रश्न सोडवायचा असेल किंवा एखादी सकारात्मक बाब करावयाची असल्यास त्यात गावाचा, नागरिकांचा आणि समाजाचा पुढाकार असल्याशिवाय ती होणे शक्य नाही. त्यामुळे हे प्रश्न निर्माण होऊ नये आणि प्रत्येक गाव बालस्नेही व्हावं यासाठी गावातील नागरिकांनी पुढाकार घेणे महत्वपूर्ण ठरेल. याच बाबीला सामोरे ठेवून संस्थेचे काम जिल्ह्यातील घाटंजी, पांढरकवडा,झरीजामणी आणि इतर तालुक्यात सुरू आहे. संपूर्ण जिल्हा बालविवाह, कुमारिमाता मुक्त बालस्नेही करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. प्रशासनाच्या पुढाकारातून जर असे ठराव जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये घेतला गेले तर प्रत्येक गावकऱ्याला त्यामध्ये आपली स्वतःची जबाबदारी असल्याची जाणीव निर्माण होईल. यामुळे बालविवाह आणि कुमारीमाता या प्रश्नांना लोक पुढाकारातून प्रतिबंध बसेल. यामुळे एक बालस्नेही जिल्हा म्हणून जिल्ह्याची संपूर्ण राज्यात ओळख निर्माण होईल. अश्याच प्रकारे संपूर्ण राज्यात ही मोहीम हाती घेता येईल.

प्रत्येक बालकाला सुरक्षित आणि हसते खेळते बालपण मिळावे हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. आणि हा हक्क त्यांचा अबाधित राहील याची जबाबदारी ही प्रशासन आणि समाजाची आहे. बालकांसाठी प्रत्येक गावच बाल स्नेही व्हावं यासाठी असे ठराव ग्रामसभेत मंजूर होणे महत्वपूर्ण ठरेल.

-आकाश बुर्रेवार

माऊली बहुद्देशीय संस्था, घाटंजी

Copyright ©