यवतमाळ सामाजिक

रावेरी येथील सीता मंदिरात होणार सीतानवमी महोत्सव आठ महिलांचा स्वयंसिद्धा सीता सन्मानाने गौरव

रावेरी येथील सीता मंदिरात होणार सीतानवमी महोत्सव आठ महिलांचा स्वयंसिद्धा सीता सन्मानाने गौरव

शेतकरी महिला आघाडी व हनुमान ट्रस्ट रावेरी यांचे आयोजन

यवतमाळ – शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांनी जिर्णोद्धार केलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील प्राचीन सीता मंदिर परिसरात सीतानवमीच्या पावन पर्वावर २९ एप्रिल २०२३ रोज शनिवारला दुपारी १२ वाजता स्वयंसिध्दा सीता सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात महाराष्ट्रातील आठ महिलांना स्वयंसिद्धा सीता सन्मान प्रदान केल्या जाणार आहे. सीतानवमी दिनी प्राचीन सीता मंदिर प्रांगणात होणार्‍या या सोहोळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सोहोळ्याच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप राहणार असून प्रमुख अतिथी माजी आमदार सरोज काशीकर, शेतकरी महिला आघाडीच्या प्रज्ञाताई बापट, वसुंधरा काशीकर, अनिल घनवट, शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष ललित बहाळे, मधुसुदन हरणे, अ‍ॅड.दिनेश शर्मा, सतीश दाणी, रावेरी सरपंच राजेश तेलंगे, वर्षा तेलंगे, रंजना मामर्डे, शेतकरी महिला आघाडीच्या माजी प्रांताध्यक्षा सिमा नरोडे, शैला देशपांडे, गिता खांडेभराड, जयश्री पाटील, सुमन अग्रवाल, निर्मला झगझाप, अंजली पातुरकर, प्रज्ञा चौधरी, हनुमान देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ज्या महिलांनी पतीच्या निधनानंतर किंवा घटस्फोटानंतर हिंमत न हारता संयमाने विपरीत परिस्थितीशी व समाजव्यवस्थेशी संघर्ष करून आपल्या पाल्यांना लवकुशा प्रमाणे पायावर उभे करून आत्मनिर्भर, समाजातील प्रतिष्ठीत व सन्माननीय नागरिक म्हणून घडवले आहे, अशा कर्तृत्ववान धैयशील मातांचा भावपूर्ण सत्कार करण्यात येणार आहे. यावर्षी श्रीमती काशीबाई महादेवराव मुठे,आर्वी छोटी,जिल्हा वर्धा, डॉ.तारा राम राठोड,दिग्रस,जिल्हा यवतमाळ, श्रीमती रेखा राजेश कापसे, नाशिक, श्रीमती शारदा प्रदीप उंबरकर,वर्धा, श्रीमती मनीषा पवार,अमरावती, श्रीमती सुनीता यदुराज गावंडे,कौलखेड जहांगीर,जिल्हा अमरावती, श्रीमती मंदा अविनाश लेंढारे,टाकळी दरणे,जिल्हा वर्धा, श्रीमती सुनीता ज्ञानेश्वर उंडे, रावेरी,जिल्हा यवतमाळ या आठ कर्तबगार महिलांचा स्वयंसिद्धा सीता पुरस्काराने भावपूर्ण सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्याला महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजक शेतकरी संघटना महिला आघाडी,हनुमान देवस्थान ट्रस्ट, स्वयंसिद्धा सीता सन्मान सोहळा आयोजन समिती, रावेरी गावकरी व सर्व बचत गट सदस्य यांनी केले आहे. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या पत्रकार परिषदेला माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, जिल्हा प्रमुख राजेंद्र झोटिंग, जयंत बापट, कृष्णराव भोंगाडे, इंदरचंद बैद, मिलिंद दामले, सोनाली मरगडे, खुशाल हिवरकर, नीलेश खोरगडे, अरुण जोग, अशोक कपिले इत्यादी उपस्थित होते.

Copyright ©