महाराष्ट्र सामाजिक

फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागाच्या पुनरुज्जीवनासाठी अनुदान

वर्धा जिल्हा प्रतिनिधी  पंकज तडस 

फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागाच्या पुनरुज्जीवनासाठी अनुदान

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

50 टक्के पर्यंत अनुदानाची तरतूद

शेतक-यांना पारंपारीक पिकासोबतच फळे, फुले व मसाला लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत अनुदान दिले जाते. विविध पिकांसाठी अनुदानाची टक्केवारी वेगवेगळी आहे. या योजनेंतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी देखील प्रोत्साहन दिले जाते.

फळे,फुले व मसाला लागवडीसह आंबा, चिक्कू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन अभियानांतर्गत केले जाते. कटफ्लॉवर या फुल लागवडीसाठी 1 लाख खर्च मर्यादेच्या अल्पभुधारक शेतक-यांना 40 टक्के अनुदान किंवा 40 हजार तर इतर शेतक-यांना 25 टक्के अनुदान किंवा कमाल 25 हजार हेक्टरी मदत दिली जाते. कंदवर्गीय फुल लागवडीसाठी 1 लाख 50 हजार खर्च मर्यादेच्या अल्पभूधारक शेतक-यांना 40 टक्के अनुदान किंवा 60 हजार इतर शेतक-यांना 25 टक्के अनुदान किंवा कमाल 37 हजार 500 रुपये हेक्टरी मदत दिली जाते.

सुटी फुले लागवडीसाठी 40 हजार रुपये खर्च मर्यादेच्या अल्पभूधारक शेतक-यांना 40 टक्के किंवा 16 हजार तर इतर शेतक-यांना 25 टक्के अनुदान किंवा कमाल 10 हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाते. मसाला पिक लागवडीमध्ये बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिकासाठी 30 हजार रुपये प्रति हेक्टर खर्च मर्यादेच्या 40 टक्के किंवा 12 हजार, बहुवर्गीय मसाला पिकासाठी 50 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेच्या 40 टक्के किंवा 20 हजार इतकी मदत दिली जाते.

विदेशी फळ पिक लागवडीसाठी ड्रॅगन फुट, अंजीर व किवी करीता 4 लाख प्रति हेक्टर खर्च मर्यादेच्या 40 टक्के किंवा 1 लाख 60 हजार, स्ट्रॉबेरीसाठी 2 लाख 80 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेच्या 40 टक्के किंवा 1 लाख 12 हजार व पॅशन फ्रुट, ब्लूबेरी, तेंदुफळ व अवॅकॅडोसाठी 1 लाख प्रति हेक्टर खर्च मर्यादेच्या 40 टक्के अनुदान किंवा कमाल 40 हजार इतकी मदत दिली जाते.

जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनांतर्गत आंबा, चिक्कू, संत्रा, मोंसबीसाठी 40 हजार प्रति हेक्टर मर्यादेच्या 50 टक्के अनुदान किंवा 20 हजार रुपये इतके कमाल अर्थसहाय्य दिले जाते. सन 2022-23 या वर्षात ड्रॅगनफुडसाठी साडेतीन हेक्टर लागवडीकरीता तसेच जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी 25 हेक्टर क्षेत्राकरीता अनुदान वितरीत करण्यात आले आहे. इच्छुक शेतकरी या अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करु शकतात.

Copyright ©