महाराष्ट्र राजकीय सामाजिक

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतले ‘प्रभु श्री रामचंद्राचे दर्शन’

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतले ‘प्रभु श्री रामचंद्राचे दर्शन’

नवी दिल्ली, 9 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या येथे ‘प्रभु श्री रामचंद्रा’च्या जन्मस्थळी दर्शन घेतले.

मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांचे आज अयोध्येत आगमन झाले असून यावेळी उभयतांचे शहरात मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मंत्री, आमदार यासह स्थानिक भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी अयोध्येतील मंदीरात ‘प्रभु श्री रामचंद्रांचे’ दर्शन घेतले तसेच यावेळी झालेल्या महाआरतीत सहभागी झाले. यानंतर अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिर परिसराला मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून स्थापत्यविषयी माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील , ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे , अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, कामगार मंत्री सुरेश खाडे, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत यासोबत खासदार राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, कृपाल तुमाणे, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे आदी उपस्थित होते.

अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

नवी दिल्ली, 9 : प्रभु श्री रामचंद्राच्या जन्मस्थळी अयोध्या येथे हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणीची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अयोध्येत आयोजित पत्रकार परिषदेत केली.

मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी अयोध्येत प्रभु श्री रामच्रंद्राच्या जन्मस्थळी दर्शन घेतले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची माहिती दिली.

यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचेही श्री शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी यांना निवेदन दिले असल्याची माहितीही श्री शिंदे यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे घेतलेल्या निणर्यांची माहिती येथील माध्यमांना दिली. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई मिळावी, यासाठी स्वत: पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले.

अयोध्येतील वातावरण भारावलेले असून राम मंदिराच्या

गर्भ गृहातील वातावरण दिव्य ऊर्जेची अनुभूती देणारे आहे. जानेवारी 2024 मध्ये मंदिरांचे बांधकाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुर्ण होईल, असे ते म्हणाले.

तत्पुर्वी मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभु श्री रामचंद्रच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. हनुमान गढी येथे जाऊन भगवान मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेऊन इतर ज्येष्ठ संत महंतांची भेट घेतली. त्यांनी

मंदीर बांधकामाची पाहणी केली. याप्रसंगी राज्याचे मंत्री, खासदार, आमदार आणि भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

मंत्री संजय राठोड यांनी केली प्रभू राम मंदिराच्या भव्य कामाची पाहणी

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत अयोध्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनी प्रभू राम चंद्राचे दर्शन घेऊन भव्य मंदिराच्या कामाची पाहणी केली.

यावेळी सर्व परिसर ‘भगवान जय श्रीराम’च्या जयघोषाने निनादून गेला. यावेळी शिवसेना, भारतीय जनता पार्टीसह प्रमुख नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिक उपस्थित होते.

Copyright ©