यवतमाळ सामाजिक

१ मे पर्यंत राबवणार ‘सामाजिक न्याय पर्व अभियान’

१ मे पर्यंत राबवणार ‘सामाजिक न्याय पर्व अभियान’

सर्व विभागांना विविध उपक्रम राबविण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

यवतमाळ दि, 6 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने १ एप्रिल ते १ मे या कालावधीत ‘सामाजिक न्याय पर्व अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत थेट जनतेशी संवाद साधण्याचे अनुषंगाने विविध विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या संदर्भातली बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सर्व विभागाच्या अधिका-यांना हे अभियान राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिलेत.

या अभियानात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या व मातंग समाजाच्या वस्त्यांना भेटी देऊन त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्यात यावी. रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच मातंग समाजासाठी २५ हजार घरे मंजूर करण्याचा निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे. जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करावे. सामाजिक न्याय पर्व मध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती द्यावी. शाळा महाविद्यालयांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करावे. शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळेत वाचन प्रेरणा उपक्रम राबवावा. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यासोबतच जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व आश्रम शाळा, शासकीय वस्तीगृह येथे ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, ऊसतोड कामगार यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात करावे.

सफाई कर्मचारी व त्यांचे पुनर्वसन कायदा याबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात याव्यात. ऊसतोड कामगारांना नाव नोंदणी, ओळखपत्र वाटप करणे, ऊसतोड कामगारांसाठी पुनरागमन शिबिर आयोजित करण्यात यावे. त्याचबरोबर ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता उपक्रम राबवून मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सामाजिक विकास योजनेचा लाभ देण्यात यावा. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक आदर्श वस्ती याप्रमाणे कमीत कमी 50 अशा अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांचे आदर्श वस्ती निर्माण करण्यात याव्यात. नव उद्योजकांसाठी उद्योजकता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात यावा. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबाबत सुद्धा जनजागृती करण्यात करावी अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंधेला समता रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी सांगितले. या बैठकिला जिल्हा समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण, ज्योतिबा दिनबंधू कल्याण मंडळ यवतमाळचे अध्यक्ष ॲड अरुण मेत्रे, ॲड. संजय येवतकर, शिक्षणाधिकारी, तसेच डॉ. रामटेके उपस्थित होत्या.

_________________________

10 एप्रीलला राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

यवतमाळ, दि. 6 एप्रील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे 10 एप्रील 2023 रोजी सकाळी 10 वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यामध्ये पियाजिओ व्हेईकल्स़ प्रायव्हेट लिमिटेड बारामती, जिल्हा पुणे या नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. तरी या भरती मेळाव्यासाठी आय टी आय फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, वेल्डर, आणि पेंटर जनरल उत्तीर्ण उमेदवारांनी सहभागी व्हावे. प्रशिक्षणार्थी यांनी बायोडाटा व मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती सोबत आणने आवश्यक आहे. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य, व्ही जे नगोरे यवतमाळ यांनी केले आहे

_______________________

सेवा सहकारी संस्थांकडून अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि 6 एप्रील :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ कडून बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याच्या उद्देशाने रू.३ लक्ष इतक्या रकमेची कामे विना निविदा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ यांचे अध्यक्षतेखाली १८ एप्रीलला काम वाटप समितीची बैठक आयोजीत कररण्यात आलेली आहे. यासाठी सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव १३ एप्रील रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करावे.

सदर काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील काही शासकीय संस्थेची सफाई कामाकरिता सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थाना काम वाटप करणे संदर्भात प्रस्ताव प्राप्त झालेला आहे.

सदर कामाकरिता दररोज चार तास प्रमाणे प्रती दिवस रू २९० प्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था,घाटंजी या संस्थेने ठरवून दिलेल्या वेळेत दर दिवशी ४ तास या प्रमाणे कामाचे दिवस गणण्यात येईल. (सुट्टीचे दिवस वगळून) या प्रमाणे कंत्राटी तत्वावर काम वाटप करावयचे आहे.

नोंदणी अद्ययावत केलेल्या संस्थांनी संस्थेचे अद्ययावत नोंदणी प्रमाणपत्र,संस्थेचे ऑडिट रिपोर्ट सन (२०२१-२२), बँकेचे स्टेटमेंट (मागील तीन महिन्याचे ) तसेच संस्थेतील सर्व सदस्यांची अद्ययावत यादी व सेवायोजना नोंदणी कार्डसह प्रस्ताव सादर करावे. तसेच उशिरा प्राप्त झालेली,अपूर्ण स्वरूपातील,अटी व शर्तीची पुर्तता करत नसेलली प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाही कृपया यांची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी कळविले आहे.

Copyright ©