यवतमाळ सामाजिक

मायेला नाही, मायापतीला शरण जा मायेपासून मुक्त व्‍हाल : हभप विनोद महाराज खोंड

यवतमाळ :

ब्रह्म सत्य जगत मिथ्या असे शास्त्र वचन आहे. याचा अर्थ अगदी सोपा आहे. हे जग हे विश्व …..हे चराचर ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. पण या निर्मिती सोबतच ब्रह्मदेवांनी मायेची सुध्दा निर्मिती केली आहे. या मायेचे दोन भाग म्हणजे धन आणि कांता या मायेचं आवरण संपूर्ण प्राणीमात्रांवर अगदी घट्ट बसलेले आहे. माया म्हणजे काय हो? जे मूळात नाही पण आभास मात्र होतो ती माया. ही माया सर्वप्रथम मनाला भ्रमित करते आणि मन आसक्तीच्या जाळ्यात अलगद अडकते. जसे मासे पकडण्यासाठी गांडूळ लावलेल्या गळाचा वापर करतात. या गळाला लावलेल्या गांडूळाला पाहून मासा आसक्त होतो. आपल्या जबड्यात जरवडतो पण गिळतांना मात्र त्याचा घसा फाटतो. साधन जन्य सुखाचं सुध्दा असच असतं. साधन संपल सुख संपलं. सुखाच्या लालसेने मायेला शरण जातो आणि आपली फसगत होते. आपल्या दुख:च मुळ कारण जर काही असेल तर ती माया आहे. म्हणून मायेला नाही…मायापतीला शरण जा…मायेपासून मुक्त व्‍हाल…असा संदेश हभप विनोद महाराज खोंड, नागपूर यांनी श्री हनुमान मंदिर हनुमान आखाडा चौक, श्री हनुमान जन्मोत्सव किर्तन महोत्सवात आपल्या किर्तनाचे द्वितीय पुष्प गुंफतांना दिला. अपरंपार प्रभू तुझी माया अपरंपार येती शरण मला ते तरती करीसी आत्म विचार हा विष्णू सुतेश्वर महाराजाचा अभंग त्यांनी निरुपणासाठी घेतला. किर्तनकाराचे स्वागत अरुण भिसे आणि रवींद्र ढगे यांनी केले. संवादीनी वादक देवीदासची पाठमासे, तबला वादक सौरभ देवधर यांचे स्वागत अशोक सिंघानिया यांनी केले. मध्यांतरात बालपांडे यांनी पायोजी मैने राम रतन धन पायो हे भजन सादर करुन श्रोत्यांची दाद मिळविली.
उत्तरार्धात या मायेने रावणाला सुध्दा मायेने भ्रमित केल्याने सीतामाईचे केलेले हरण, हा कथाभाग अत्यंत प्रभावीपणे कथन केला. रतन चौधरी, सुनील यादव, संदीप पंड्या, रोशन यादव यांनी अत्यंत भावपूर्ण स्वरात हनुमान चालीसा सादर केला. आरतीचे यजमान पद ईश्वर राय, वासुदेवराव बावीस्कर, गोविंद यादव, नंदकुमार बदनोरे, सुभाष चंद्रकांत सारवे, दिपक ठाकूर, विलास देशपांडे, जगदीश मुराई यांनी स्विकारले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर सुरजूसे यांनी केले.

Copyright ©