यवतमाळ सामाजिक

*निम्न पैनगंगा धरण विरोधी समिती आक्रमक*

८ एप्रिल ला कापेश्वर येथील जाहीर सभेतून आंदोलनाचे रणशिंग फुंकणार.

सावळी सदोबा ( वार्ता ) आशिफ खान
विदर्भ व मराठवाड्याच्या ९५ गावावर नांगर फिरवून शेतकरी शेतमजुरांना विस्थापित करणाऱ्या निम्न पैनगंगा धरणाला विरोध करण्यासाठी निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीने कंबर कसली आहे त्याचाच एक भाग म्हणून दि. ८ एप्रिल शनिवार रोजी दुपारी १२ वाजता विदर्भ व मराठवाड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कापेश्वर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, या सभेतून समिती आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा हे धरण चर्चेत आले आहे.
९५  गावावर नांगर फिरवून एक लाख जनतेला  विस्थापित करणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पाला गेल्या २५ वर्षांपासून विरोध होता व तोच विरोध आजही कायम आहे.
आता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाची आग्रही भूमिका असल्याने बुडीत क्षेत्रातील  विस्थापित होऊ पाहणाऱ्या शेतकरी शेतमजुरांनी तीव्र विरोध चालविला आहे .
बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद झाल्याचे शासनाचे पत्र निघताच प्रथम सावळी सदोबा येथे १० नोव्हेंबर २०२२ रोजी सहविचार सभा घेऊन धरण विरोधी संघर्ष समितीने सर्व शेतकरी शेतमजुरांना सोबत घेऊन या धरणाच्या विरोधात कंबर कसली आहे.
या धरणात विकसित झालेली ९५ गावे , ऐक‌ लाख लोकं,जवळपास २० हजार हेक्टर सुपिक शेतजमीन व ऐक‌ हजार हेक्टर समृद्ध जंगल बुडीत क्षेत्रात जाणार आहे.
जाहीर सभेत बुडीत क्षेत्रातील लोकांच्या मनातील अनेक प्रश्नांचे निरसन केल्या जाईल, नवीन स्वीकारण्या, योग्य सूचना असल्यास त्या स्वीकारण्यात येईल, आंदोलनाचे ध्येय धोरण विशद करून अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल,
या सभेला जेष्ठ पत्रकार तथा प्रसिद्ध लेखक पद्माकर मलकापुरे यवतमाळ, विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांची कन्या  तथा विदर्भ अन्याय निवारण समिती अध्यक्षा ऍड  क्रांतीताई धोटे (राऊत),सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता भास्करराव पंडागळे यांची उपस्थिती राहून मोलाचे मार्गदर्शन करणार आहे तेव्हा  बुडीत क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच, गावकरी मंडळी, महिला पुरुष, युवक ,युवतींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक सचिव मुबारक तंवर यांनी केले आहे

Copyright ©