Breaking News महाराष्ट्र राजकीय

विविध महत्व पूर्ण बातम्या सह….

 

प्रतिनिधि

शासकीय योजनांची जत्रा पोहचणार शेवटच्या व्यक्तीपर्यंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना; सातारा, औरंगाबादला प्रायोगिक तत्वावर सुरू

मुख्य सचिवांनी साधला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद

 

मुंबई, दि. 29 : राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवीत आहे. सामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती, अर्ज केल्यावर लाभ कसा मिळतो, कुठे अर्ज करावा…कागदपत्रे काय जोडावीत…याची माहिती नसते. यामुळे काहीजण शासकीय योजनांपासून वंचित राहतात. याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद साधला. हा कार्यक्रम अभियानस्तरावर राबवून अद्यापपर्यंत शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या लाभार्थींना लाभ मिळवून देण्याचे आवाहन मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांनी सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना केले.

या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, ग्रामविकासचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, समाजकल्याणचे सचिव सुमंत भांगे, माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक जयश्री भोज यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्री वॉर रूमचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासन, शासन आणि जनता एकत्र आल्यास सामान्य जनतेच्या कोणत्याही समस्या राहणार नाहीत, हेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हेरून शासकीय योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी एकाच छताखाली सर्व अधिकारी-जनता जत्रेच्या रूपात आणून जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून देणार आहेत. यानुसार सातारा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांनिमित्त ३६ विभागामार्फत ७५ शासकीय योजनांची माहिती आणि लाभ प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थींना देण्यात येणार आहे. यामध्ये आणखी योजना वाढविण्यात येणार आहेत. या जत्रेनुसार एप्रिल महिन्यात सर्व विभागांनी आपापल्या योजनांची माहिती, शासन निर्णय याबाबत पूर्वतयारी करावी. योजनानिहाय लाभार्थी निवड, त्यांचे अर्ज भरून घेणे याबाबतही तयारी करावी. योजनांचा लाभ मे महिन्यामध्ये देण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही श्री. श्रीवास्तव यांनी केल्या.

लाभार्थींना जलद, कमी कागदपत्रामध्ये आणि शासकीय निर्धारित शुल्कात योजनेचा लाभ देण्यात येणार असून तीन दिवस सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी एकाच छताखाली एकाच ठिकाणी राहणार आहेत. यामध्ये योजनांचा लाभ मिळवून देणे, आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करणे, योजनांची माहिती देणे हा मूळ उद्देश या जत्रेचा आहे. जत्रेत एकाच योजनेचा लाभ मिळणार नसून यामध्ये त्या कुटुंबाला अन्य योजनांचीही माहिती होणार आहे. यामुळे विविध योजनांचा लाभ एकाच गरीब कुटुंबाला झाल्यास ते कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर यायला हातभार लागणार आहे. यामुळे या जत्रेत प्रत्येक विभागांनी आपल्या विविध योजनांबाबत माहितीही पुस्तक रूपाने प्रसिद्धीस देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

जत्रेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना थेट जनतेशी संवाद साधता येणार आहे. यामुळे जनतेच्या समस्या जवळून पाहता येणार असल्याने त्या समस्येवर उपाययोजना करता येणार आहेत. सर्व नियोजन मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार असून गावपातळीवरील कर्मचाऱ्यांच्या मार्फत योजनांची माहिती ‘हर घर दस्तक’च्या रूपाने देता येणार आहे. यामध्ये सर्व यंत्रणांचा समावेश राहणार आहे. यासोबतच सीएससी सेवा सेंटर, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांचीही मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक विभागांनी त्यांच्या पात्र लाभार्थींना योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

अंमलबजावणी आणि मार्गदर्शनासाठी असणार जनकल्याण कक्ष

सर्व कार्यक्रमांची रूपरेषा, अंमलबजावणी, नियंत्रण करण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष असणार आहे. विभागीय पातळीवर विभागीय जनकल्याण कक्ष, जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावरही जनकल्याण कक्षांची स्थापना करून याद्वारे नियंत्रण करण्यात येणार आहे.

पात्र लाभार्थीला मुख्यमंत्र्यांचे प्रमाणपत्र

विविध योजनांसाठी पात्र असणाऱ्या आणि लाभ घेणाऱ्या लाभार्थींना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडून लाभाबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विविध योजनांसाठी पात्र लाभार्थींना योजना मंजुरीची पत्रे देण्याचा कार्यक्रम जिल्हावार लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील सर्व विभागांनी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयांशी संपर्क साधून लाभ देण्यासाठी करावयाच्या कार्यवाहींची पूर्तता त्यांच्या स्तरावर करुन घ्यावी. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून शासन निर्णयाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अमोल शिंदे यांनी या उपक्रमाचे सादरीकरण केले. मुख्यमंत्री वॉर रूमचे विद्यार्थी, आयआयटीचे विद्यार्थी या उपक्रमाला मदत करणार आहेत. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, विभागांचे सचिवांनी यावेळी विविध सूचना केल्या. साताराचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी उपक्रमाबाबत सध्या करीत असलेल्या अंमलबजावणीची माहिती दिली.

—————————————

गोसीखुर्द प्रकल्पामध्ये होणार जलपर्यटन प्रकल्प

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी

 

मुंबई, दि. 29 : “राज्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या परिसरात पर्यटन विकासासाठी संधी असून या संधी विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकास करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल”, असे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यात भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकासाबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

या कार्यक्रमास पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार नरेंद्र भोंडेकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक श्रद्धा जोशी उपस्थित होत्या.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विशेषतः, दुर्गम भागात कमी वेळेत पर्यटनस्थळाच्या विकासात जलपर्यटन महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्यामुळे अर्थव्यवस्था गतिमान होण्यास मदत होते तसेच रोजगाराच्या संधी वाढतात. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे गोसीखुर्द जलाशय आणि परिसराचा जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून विकास करता येणार आहे.

“जगातील बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पर्यटन हा मुख्य घटक मानला जातो आणि राज्य शासन राज्यातील पर्यटन विकासावर विशेष लक्ष देत आहे. या सामंजस्य कराराद्वारे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित होवून स्थानिक तरुणांसाठी 80 टक्के रोजगार निर्मिती होईल. तसेच पर्यावरणास अनुकूल आणि शाश्वत पद्धतीने जलपर्यटन निर्माण होईल. राज्याच्या दुर्गम भागातील स्थानिक समुदायांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी हा करार अत्यंत महत्वाचा आहे”, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. मोहिते यांनी १०१ कोटी रूपयांच्या या प्रस्तावित प्रकल्पातंर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, प्रकल्पाची प्रस्तावित माहिती, पायाभूत सुविधा, जलपर्यटन, पर्यटकांची व वाहतुकीची अंदाजित संख्या, प्रकल्पाचे लाभ याविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी जलसंपदा विभागाचे सहसचिव संजय टाटू, उपसचिव नमिता बसेर, कार्यकारी अभियंता सोनल गायकवाड आदी उपस्थित होते.

————————————–

सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये

“मिशन थायरॉईड अभियान” राबविण्यात येणार

– वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

 

मुंबई, दि. 29 : वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत रुग्णसेवेसाठी व विविध रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विविध अभियाने सुरु केली असून राज्यात 30 मार्च 2023 पासून ‘मिशन थायरॉईड अभियान’ राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

‘मिशन थायरॉईड’ या अभियानाचे उद्दिष्ट थॉयराईड रोगासंदर्भात जनजागृती करणे व त्यासंबधात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देणे हे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर गुरुवारी दुपारी 12 वाजता औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत विशेष थायरॉईड ओ.पी.डी. चालविली जाणार असून त्यामध्ये Physician, Surgeon, Endocrinologist, Pathologist, Sonologist व Biochemist अशा विविध तज्ञांचा एकत्र समावेश राहणार आहे. थायरॉईडच्या विविध आजारांच्या औषधोपचारांची व ब-याच दृश्य स्वरुपातील थायरॉईडचे विविध परिणाम जसे अन्न घेताना त्रास होणे, श्वास गुदमरणे तसेच थायरॉईडचे विविध कॅन्सर यांसंबधी शस्त्रक्रियाची सोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

थायरॉईडच्या विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांनी दर गुरुवारी दुपारी 12 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत थायरॉईड क्लिनिकच्या सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

साधारणपणे प्रत्येकी 1 लाख महिलांमागे अंदाजे 2,000 महिलांना दृश्य स्वरुपात थायरॉईडची गाठ मानेवर दिसून येते. त्याचप्रमाणे अनेक महिलांना थायरॉईडची गाठ मानेवर दिसत नसताना देखील विविध थायरॉईडचे आजार झालेले आहेत. त्यातील बऱ्याचशा थायरॉईडच्या आजारांचे दीर्घकाळापर्यंत निदानदेखील होत नाही. अशा सर्व महिला, पुरुष आणि बालकांनादेखील या संपूर्ण अभियानाचा फायदा होणार आहे. अनेकदा थायरॉईडच्या रोगांनी ग्रस्त महिला आणि पुरुषांना आळस, सुस्तपणा, शरीरावर सूज येणे, भूक न लागतादेखील वजन वाढणे, आवाजात एकप्रकारचा जाडपणा अथवा घोगरेपणा येणे ही लक्षणे थायरॉईड ग्रंथींचे काम मंदावल्याचे दर्शवितात. अनेकदा अशा महिलांना वारंवार गर्भपाताला सामोरे जावे लागते. नवजात बालकांमध्ये थायरॉईड ग्रंथींच्या स्त्रावाअभावी मानसिक दुर्बल्य येऊन अशी बालके लहान खुरी व मंदबुध्दी होऊ शकतात. थायरॉईड ग्रंथींच्या अतिस्त्रावामुळे अतिजास्त रोडपणा, छाती धडधड करणे व क्वचितप्रसंगी डोळे बाहेर येणे अथवा अंधत्वदेखील येऊ शकते.

——————————————

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना शोक

 

मुंबई, दि. 29 : राज्यपाल रमेश बैस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

“लोकप्रिय खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीश बापट यांनी संसद सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य, कॅबिनेट मंत्री, संसदीय समित्यांचे सदस्य यांसह विविध पदांवर उल्लेखनीय कार्य केले. कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात आलेले गिरीश बापट हे कुशल संघटक होते. त्यांचा जनसंपर्क अतिशय व्यापक होता. राजकारणात ते अजातशत्रू होते. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक लोकप्रिय नेता व अनुभवी संसदपटू गमावला आहे”, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकासंदेशामध्ये म्हटले आहे.

————————————–

 

जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले!

खा. गिरीश बापट यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

 

मुंबई, दि. 29 : “भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. विकास हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता”, अशी शोकसंवेदना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर ते खासदार झाले. 2014 ते 2019 या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या उभारणी करणाऱ्या नेत्यांमध्ये ते अग्रणी होते. जनतेचे त्यांना भरभरुन प्रेम मिळाले.

पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. आजारी असतानासुद्धा सातत्याने मतदारसंघावर त्यांचे लक्ष असायचे. त्यांचे निधन ही भारतीय जनता पक्षाची अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.
————————————–

राजकारणातील मित्रत्व जोपासणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले

राधाकृष्ण विखे पाटील यांची श्रद्धांजली

 

मुंबई, दि. 29 : “भाजपचे नेते आणि खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले” अशी भावना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे विधिमंडळात त्यांचा सहवास लाभला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यावेळी श्री. बापट संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहायचे. राजकारणात फार कटूता येऊ न देता सभागृहातील निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगावर संवादाने मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.

महानगरपालिका ते लोकसभा हा गिरीष बापट यांचा राजकीय प्रवास त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा होता. पुणे आणि गिरीष बापट हे एक अतूट नाते होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले असून पक्षाच्या वाटचालीतील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करून मंत्री विखे पाटील यांनी गिरीष बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

————————————–

रायगड-अलिबाग कुटुंब न्यायालयाच्या कार्यकक्षेत विस्तार

 

मुंबई दि. 29 : रायगड-अलिबाग येथील कुटुंब न्यायालयाच्या कार्याचा विस्तार पेण-मुरूड तालुक्याच्या क्षेत्रापर्यंत करण्यात आला आहे. यामुळे या क्षेत्रातील रहिवाशांची कौंटुबिक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यास सहकार्य लाभणार आहे.

राज्य शासनाने उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून, रायगड-अलिबाग कुटुंब न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक मर्यादा, पेण व मुरूड तालुक्याच्या संपूर्ण क्षेत्रापर्यंत वाढविल्या आहेत. या न्यायालयाच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादा अलिबाग नगरपालिका क्षेत्राच्या मर्यादेशी समकक्ष तसेच तालुक्याच्या संपूर्ण स्थानिक सीमांतर्गत क्षेत्राशी तसेच मुरूड तालुक्याच्या संपूर्ण स्थानिक सीमांतर्गत क्षेत्राशी समकक्ष असतील, असे विधी व न्याय विभागाने अधिसूचनेद्वारा कळविले आहे.

———————————-

विभागीय हातमाग कापड स्पर्धा 31 मार्च रोजी आयोजित;

अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. 29 : राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता व विणकारांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ट वाणाला सम्मान मिळावा, या दृष्टीकोनातून मुंबई विभागात ‘ विभागीय हातमाग स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे.

या स्पर्धेचे आयोजन दिनांक 31 मार्च 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता वस्त्रौद्योग मुंबई, भोरुका चॅरीटेबल ट्रस्ट, ट्रान्सपोर्ट हाऊस, 5 वा मजला, 128-ब पुना स्ट्रीट, मस्जीद (पूर्व) 400009 येथे करण्यात आले आहे.

हातमाग कापडाचे नमुने वरील कार्यालयात दि. 31 मार्च 2023 रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत दाखल करुन नमुन्यावर त्यांचे नाव, पत्ता वापरण्यात आलेल्या धाग्याचा प्रकार डिझाईन, रंग व कापडाची विशेषत: अशाप्रकार कापडाचे वितरण किंमतीसह देणे आवश्यक आहे. वेळेनंतर आलेले नमुने स्वीकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी वरील पत्त्यावर तसेच ईमेल-rddtextiles3mumbai@rediffmail.com, दूरध्वनी क्र.022-23700611 येथे संपर्क साधता येईल.

स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विणकरांनी कमीत कमी 1 नग व मिटरमध्ये कमीत कमी 2 मिटर कापड स्पर्धेकरीता पाठवावे. विभागीय हातमाग कापड स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस पात्र नमुन्याकरिता अनक्रमे 25 हजार, 20 हजार व 15 हजार रुपये बक्षीस देण्यात येईल, हातमाग विणकरांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन, प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रौद्योग, मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Copyright ©